पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या अकरा जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. तर, सदस्यांच्या 109 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 100 जागांसाठी 240 उमेदवार उभे ठाकले आहेत. मोहरी, वडगाव, सोनोशी, कोळसांगवी, निवडुंगे, भालगाव, वैजूबाभूळगाव, कोरडगाव, कोल्हार, तिसगाव, जिरेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सोनोशी येथे कल्पना दौंड, आशाबाई बोरुडे, संदीप काकडे, शारदा दौंड, पंचफुला काकडे हे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कोरडगाव येथे माया ससाणे, कोळसांगवी येथे द्रौपदी गाडे, देऊबाई साळवे, तर मोहरी येथे रंभाबाई खटके बिनविरोध निवडून आल्या आहेत. जिरेवाडी, सोनोशी, वडगाव येथील सरपंचपदासाठी चौरंगी, तर मोहरी, निवडुंगे, भालगाव, वैजू बाभुळगाव, तिसगाव येथे सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. तर, उर्वरित ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. तिसगाव येथे सरपंच पदासाठी गंगूबाई लोखंडे, मुनीफा शेख व हिना शेख यांच्यात लढत होणार आहे. तर, भालगाव येथे पोपट रोकडे, संपत रोकडे, राजेंद्र चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. कोरडगाव येथे साखरबाई म्हस्के, पद्मावती घुगरे यांच्यात सरळ लढत होणार आहे.