नगर : पिंपळगाव लांडगा, चिंचबन, बनपिंप्री ग्रामपंचायती बिनविरोध | पुढारी

नगर : पिंपळगाव लांडगा, चिंचबन, बनपिंप्री ग्रामपंचायती बिनविरोध

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा, नेवासा तालुक्यातील चिंचबन, श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री या तीन ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या आहेत. याशिवाय नेवासा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे सरपंचपद देखील बिनविरोध झाले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीपैकी पिंपळगाव लांडगा येथील सरपंचपदासह आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या तालुक्यातील 243 सदस्यांच्या जागेपैकी 29 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 26 ग्रामपंचायतीच्या 214 सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे.

नेवासा तालुक्यात 13 ग्रामपंचायती असून, चिंचबन ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली आहे. याशिवाय 5 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले. त्यामुळे 12 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 197 जण रिंगणात आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 22 जण रिंगणात आहेत. शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून, एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही. सरपंच पदासाठी 38 तर सदस्यपदाच्या 108 जागांसाठी 262 उमेदवार रिंगणात आहेत. पारनेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 43 तर सदस्यपदांसाठी 335 उमेदवार रिंगणात आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली आहे.

Back to top button