सोनई : ट्रॅक्टरखाली सापडून मुलगा ठार ; सोनईत जमाव संतप्त | पुढारी

सोनई : ट्रॅक्टरखाली सापडून मुलगा ठार ; सोनईत जमाव संतप्त

सोनई : पुढारी वृत्तसेवा : सोनई येथील लांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून 14 वर्षे वयाचा मुलगा ठार झाला. संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत चालक आरोपीला अटकेचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.  शुभम बाबासाहेब कांबळे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. तो  सोनई येथील गरीब कुटुंबातील सुलभ शौचालयातील कर्मचारी बाबासाहेब कांबळे यांचा मुलगा होता.

दूध आणण्यासाठी सायंकाळी सहा वाजता तो सायकलवरून जात होता. वीट भट्टीची वाहतूक करणार्‍या भरघाव वेगातील डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तो ठार झाला. अपघाताची माहिती समजताच  घटनास्थळी मोठा जमाव जमला. जमावाने ट्रॅक्टर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सरपंच दादासाहेब वैरागर व सहाय्यक फौजदार राजू थोरात व पोलीस पथकाने जमावाची समजूत काढत शांत केले. आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेला आहे.

Back to top button