भाजपच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर सोमय्या गप्प का? : जोगेंद्र कवाडे - पुढारी

भाजपच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर सोमय्या गप्प का? : जोगेंद्र कवाडे

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून केले जात आहेत. मात्र, यापूर्वी भाजप सत्तेत असताना त्यांच्या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबद्दल भाजपाचे किरीट सोमय्या का बोलत नाहीत? असा सवाल करत त्यांनी त्याचेही पुरावे ईडीकडे द्यावेत, त्यांच्या तत्कालीन मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी केली .पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने अहमदनगर येथे आले असता जोगेंद्र कवाडे हे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, शहराध्यक्ष महेश भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी कवाडे म्हणाले की, ‘ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी झाली पाहिजे, याबद्दल माझे दुमत नाही. आज जे सत्तेवर आहेत, त्या मंत्र्यांवर भाजपाचे किरीट सोमय्या हे आरोप करत सुटले आहेत.’

‘भाजप या अगोदर सत्तेमध्ये असताना चिक्की घोटाळा प्रकरणामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्याबद्दल किरीट सोमय्या का बोलत नाहीत? असा सवाल करत या प्रकरणाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, सोमय्या यांनी ती कागदपत्रे सुद्धा ईडीकडे दिली पाहिजेत व त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे, अशी मागणीदेखील जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी केली.’

भ्रष्टाचाराबाबत या अगोदर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता त्यांचे तोंड का बंद आहे? आपल्या राजकीय सोयीसाठी कोणाला भ्रष्टाचारी ठरवायचे का, असा आता प्रश्न पडला आहे? असा टोलाही जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी लगावला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button