नगरमध्ये सत्तारांना फिरू देणार नाही ! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके | पुढारी

नगरमध्ये सत्तारांना फिरू देणार नाही ! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके

नगर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचेबद्दल बोलताना गलिच्छ भाषेत टीका केली. सत्तार यांना नगर जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही आणि जिल्ह्यात कुठे दिसल्यास तोंड काळे करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला. दरम्यान, काल दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रवादीकडून निषेध नोंदविला गेला.

फाळके म्हणाले, सत्तार यांनी मंत्री पदाची शपथ घेत असताना कोणाबद्दलही गलिच्छ भाषेत बोलणार नाही, अशी शपथ घेतली आहे. या संविधानिक शपथीचा सत्तार यांना विसर पडलेला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते, तर या अब्दुल सत्तारचा चौरंगा केला असता. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशाप्रकारे गलिच्छ वक्तव्य ते ही एखाद्या महिलेबद्दल करते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहे.

अब्दुल सत्तार यांना सत्तेचा गर्व झाला आहे. त्यामुळेच त्यांची भाषा बदलली आहे. परंतु सत्ता जास्त दिवस नसते. त्यामुळे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी फाळके यांनी केली. दरम्यान, आज मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाभरात नगरसह अन्य ठिकाणी निषेध मोर्चे तसेच आंदोलने केली जाणार असल्याचेही फाळके म्हणाले.

 

 

Back to top button