नगर : अधिकारी, पदाधिकारी संशयात? नागेबाबा, शहर बँक बनावट सोनेतारण; पोलिसांनी पुन्हा मागितली कागदपत्रे | पुढारी

नगर : अधिकारी, पदाधिकारी संशयात? नागेबाबा, शहर बँक बनावट सोनेतारण; पोलिसांनी पुन्हा मागितली कागदपत्रे

नगर : पुढारी वृत्तसेवा  : बनावट सोनेतारण प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शहर बँकेसह नागेबाबा पतसंस्थेकडे पुन्हा कर्ज प्रकरणासह अन्य कागदपत्रे मागितली आहेत. तसेच गोल्ड व्हॅल्युअर नेमण्याचे निकष काय? ठेवींवर कर्ज देण्यासाठी असलेले नियम व प्रक्रिया काय? याचा तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता नागेबाबा सोसायटीसह शहर बँकेचे अधिकारी, पदाधिकारी संशयाच्या भोवर्‍यात आल्याची चर्चा आहे. शहर सहकारी बँक व संत नागेबाबा पतसंस्थेतील बनावट सोनेतारण प्रकरण गत महिनाभरापासून चर्चेत आले आहे.

कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासात संत नागेबाबा व शहर बँकेची मिळून सुमारे साडेसहा कोटींनी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले याच्यासह त्याचे साथीदार साथीदार सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सीताराम कदम व सचिन जाधव या मुख्य आरोपींसह शंभरच्यावर आरोपींचा गुन्ह्यांत समावेश करण्यात आला आहे. संत नागेबाबा सोसायटीच्या 65 कर्जदारांच्या 150 कर्जखात्यांमध्ये तीन कोटी 20 लाख 36 हजारांचे सुमारे साडेनऊ किलो बनावट सोने आढळून आहे.

तर, शहर सहकारी बँकेच्या 40 कर्जदारांच्या 40 खात्यांमध्ये तीन कोटी 13 लाख 24 हजार रूपयांचे सुमारे दहा किलो बनावट सोने आढळून आले.  या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून संत नागेबाबा व शहर बँकेला तपासासाठी कागदपत्रे सादर करण्यास पत्रव्यवहार केला आहे. गोल्ड व्हॅल्युअर नेमण्याच्या निकषांसह सोनेतारणावर कर्ज देण्यासाठी काय प्रक्रिया आहे, या दिशेने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संत नागेबाबा व शहर बँकेकडे कागदपत्रांसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. गोल्ड व्हॅल्युअर नेमण्याचे निकष, सोने तारणावर कर्ज देण्याची प्रक्रिया याचा तपास करण्यात येईल.
                                – अरुण आव्हाड पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

 

त्या’ पतसंस्थांची चौकशी का नाही?
गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले याच्या घर झडतीत शहर बँक, नागेबाबासह काही पतसंस्थांच्या कर्ज पावत्या आढळल्या होत्या. त्यानंतरच नागेबाबामधील घोटाळा उघडकीस आला. मात्र, आरोपीकडे कर्ज पावत्या आढळलेल्या भिंगारमधील व कापड बाजारातील ‘त्या’ पतसंस्थेची कोणतीही चौकशी झाली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Back to top button