वाळकी : अत्याचाराचा व्हिडिओ केला व्हायरल ; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या | पुढारी

वाळकी : अत्याचाराचा व्हिडिओ केला व्हायरल ; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिसांच्या पथकाने आरोपी किशोर सीताराम तळेकर (रा.वाळुंज, ता.नगर) याला अटक केली आहे. त्याने नगर तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला 22 जुलै रोजी दुपारी फिरायला जाण्याच्या बहाण्याने नगर-दौंड रोडवरील अरणगाव परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. त्यावेळी सदर महिलेने त्यास व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नको, अशी विनंती केली. मात्र त्याने तिला दमबाजी करत व्हिडिओबाबत जर कोणास काही सांगितले, तर तुला जिवे ठार मारील, अशी धमकी दिली.

या घटनेनंतर भितीपोटी सदरील महिलेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपीने तो अश्लिल व्हिडिओ त्या महिलेच्या गावातील काही जणांना पाठविला. तो व्हिडिओ नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांच्या मोबाईलवर व्हायरल झाला. महिलेच्या पतीच्या मित्राच्या निदर्शनास तो व्हिडिओ आल्यानंतर त्याने ही बाब महिलेच्या पतीला सांगितली. त्यामुळे त्या महिलेला व तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी शुक्रवारी (दि.7) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
किशोर तळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने त्यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास पारनेरचे पोलिस निरीक्षक घन:श्याम बळप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.दरम्यान आरोपी तळेकर यास शनिवारी (दि.8) दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यास दि. 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Back to top button