वाळकी : के.के. रेंजमध्ये घुसून वाळू चोरीचा प्रयत्न | पुढारी

वाळकी : के.के. रेंजमध्ये घुसून वाळू चोरीचा प्रयत्न

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : लष्कराच्या के. के. रेंज या युद्धसराव क्षेत्रात घुसून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. युवराज चिमाजी भालेराव (रा.ढवळपुरी, ता.पारनेर), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावाजवळ लष्कराचे के. के. रेंज युद्धसराव क्षेत्र असून, या ठिकाणी नेहमीच युद्धाचा सराव सुरू असतो. त्यामुळे या परिसरात प्रवेश करण्यास नागरिकांना बंदी आहे; मात्र अनेकजण परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करत भंगार गोळा करण्यासाठी जात असतात.

काही जणांचा भंगार गोळा करताना न पडलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन मृत्यू झाला आहे. अनेक जणांना अपंगत्व आले आहे. मंगळवारी (दि.4) दुपारी अडीच वाजता युवराज भालेकर याने के.के. रेंज क्षेत्रात प्रवेश करून नाल्यामध्ये वाळू चोरून नेण्याच्या इराद्याने वाळू गोळा करत असल्याचे गस्तीवर असलेल्या लष्कराच्या पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत सुभेदार दलबीरसिंग ओमप्रकाश यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी युवराज भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button