नगर : चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी केला गजाआड | पुढारी

नगर : चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी केला गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतील आरोपीला आठ लाख 10 हजारांच्या दागिन्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. त्याच्याकडून सुमारे 93 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तारकपूर बस स्थानकासमोर फिर्यादी शैला सीताराम पाटील (रा. तारकपूर बस स्थानकासमोर) या आपल्या मैत्रिणीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी मोटारसायकलवरुन केडगाव बायपास रोडने मनमाडकडे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. तर, एकजण पळून गेला. सदर आरोपीने जिल्ह्यात पारनेर, राहुरी, तोफखाना, राहाता, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. अटक केलेला आरोपी हा अल्पवयीन असून, पुढील कारवाई तोफखाना पोलिस करत आहेत.

Back to top button