मुळा-प्रवरा टिकविण्यासाठी संघर्ष संपविणार ! : खा. डॉ. सुजय विखे | पुढारी

मुळा-प्रवरा टिकविण्यासाठी संघर्ष संपविणार ! : खा. डॉ. सुजय विखे

लोणी : पुढारी वृत्तसेवा : संघर्षानंतरही मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे अस्तित्व कायम ठेवून, या संस्थेचे पुनरुर्जीवन करण्याचा प्रयत्न मागील सात वर्षांच्या कार्यकाळामध्ये संचालक मंडळाने केला, असे स्पष्ट करुन, भविष्यातही संघर्ष संपवून ही सहकारी संस्था टिकविण्यासाठी राजकीय भूमिकेच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खा. डॉ. विखे बोलत होते.  या सभेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, भानुदास मुरकुटे, सुभाष पाटील, इंद्रभान थोरात, जलिलभाई पठाण, अंबादास ढोकचौळे, सिद्धार्थ मुरकुटे, संजय छल्लारे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.

सभासदांशी संवाद साधताना खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले, विद्यमान संचालक मंडळाला कोविडच्या कारणाने सातत्याने मुदतवाढ मिळत गेली. संस्थेच्या प्रश्नांबाबत सातत्याने सरकार व न्यायालयापुढे बाजू मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामध्ये सहकारी संस्थेचे हित आणि शेतकर्‍यांना न्याय मिळावा, हिच भूमिका होती, असे खा. डॉ. विखे पा. म्हणाले. माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी, शेतकर्‍यांची पीक विमा योजनेत होत असलेली अडचण सोडविण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जिल्हा बँकेलाही एकरकमी कर्जफेड योजना सुरु करण्यास परवानगी मिळावी.

मागील धोरणाप्रमाणेच साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या रॉ शुगर निर्यातीबाबत कोटा प्रणाली रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन केले.  माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. म्हणाले, राजकीय, सामाजिक जीवनात मोठे संघर्ष पाहायला मिळाले. मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. परंतु, मुळा-प्रवरा संस्थेच्या चेअरमन पदावरुन जिरायती, बागायती पट्ट्यातील शेतकर्‍यांसाठी जी कामे करता आली, त्याचे मोठे समाधान आहे. मुळा-प्रवरा सहकारी संस्थेमुळेच श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यांच्या विकासाला गती मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  सभेसाठी सभासद, कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. संचालक दीपक शिरसाठ यांनी आभार मानले.

Back to top button