सरपंच पतीकडून धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी | पुढारी

सरपंच पतीकडून धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : महिला सरपंचाच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधले असून, त्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याने, सरपंचाच्या पतीने तक्रारदारास शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शुक्रवारी (दि.23) घडली. याबाबत दादासाहेब राजाराम जावळे (रा.गुंडेगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावळे यांनी सरपंच मंगल संतोष सकट व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार तहसीलदार पाटील हे शुक्रवारी (दि.23) दुपारी गुंडेगाव येथे आले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या शिपायाने तक्रारदार जावळे यांना त्या ठिकाणी बोलावले. त्यामुळे दादासाहेब जावळे हे तेथे गेले असता महिला सरपंचाचे पती संतोष सकट यांनी तक्रारदार जावळे यांना धक्काबुक्की करीत तुझ्याकडे पाहून घेतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दादासाहेब जावळे यांनी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संतोष सकट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button