पारनेर : भरधाव कंटेनरने महिलेला चिरडले | पुढारी

पारनेर : भरधाव कंटेनरने महिलेला चिरडले

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर अपघात मालिका चालूच असून, वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने मोटारसायकलला मागून धडक देत महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.24) दुपारी घडली. बुधवारी दुपारी तीन-चारच्या दरम्यान मोटारसायकलने (एमएच 16 सीझेड 0526) मुलगा, आई व छोटी नात शिरूरकडून नगरच्या दिशेने येत असताना वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात हॉटेल फाऊंटनसमोर कंटेनरने (एमएच 12 एचडी 5321) मोटारसायकला जोराची धडक दिली.

यात मोटारसायकलवरील मुलगा व नात एका बाजूला पडले, तर आई एका बाजूला पडल्या. यावेळी कंटेनरने त्यांना चिरडले. यात गंगुबाई बाबुराव सातपुते (वय 58, रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह रुग्णवाहिकेने पारनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. या घटनेतील कंटेनरचालक गाडी सोडून पळून गेल्याचे सुपा पोलिसांनी सांगितले.

Back to top button