नगर : खून प्रकरणातील मृतदेह अखेर सापडला | पुढारी

नगर : खून प्रकरणातील मृतदेह अखेर सापडला

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : पिंपरणे-जोर्वे रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू असतानाच काल सकाळी दाढ जवळील नदीपात्रात शोध पथकाला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. तो मृतदेह गेल्या बुधवारी वेल्हाळे शिवारात खून करून प्रवरा नदीच्या पात्रात फेकून दिलेल्या बाळू शिरोळे याचाच असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी ओळखले आहे.

मृतदेह अनोळखी असल्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील दाढ खुर्द परिसरामध्ये प्रवरा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला असल्याची खात्रीशीर माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार यांनी लोणी येथे जाऊन समक्ष पाहणी केली.
हा नेमका मृतदेह कोणाचा आहे, याची खात्री करण्यासाठी मागील बुधवारी 8 जणांनी अपहरण करून नंतर वेल्हाळे शिवारात नेऊन त्याचा निर्घृण खून करून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कासारा दुमाला शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावरून नदीपात्रामध्ये फेकून दिलेल्या येठेवाडी येथील बाळू शिरोळे याचाच असण्याची दाट शक्यता पोलिसांना होती.

त्यामुळे त्यांनी तत्काळ बाळू शिरोळे यांच्या नातेवाईकांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात बोलावून घेतले. त्यांना सदरचा मृतदेह दाखविल्यानंतर बाळू शिरोळे याचाच असल्याचे ओळखले. त्यानंतर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे.

Back to top button