नगर : कर्जतची शिवसेना ठाकरेंच्याच पाठीशी! | पुढारी

नगर : कर्जतची शिवसेना ठाकरेंच्याच पाठीशी!

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यामधून 547 शिवसैनिकांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे प्रतिज्ञापत्र मातोश्री (मुंबई) येथे पाठविले आहे. तसेच, सर्व शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव व जामखेड तालुका प्रमुख संजय काशीद यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी ज्येष्ठ नेते अमृत लिंगडे, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीर बोरा, उपतालुकाप्रमुख सुभाष जाधव, संजय शेलार, चंद्रकांत घालमे, शहरप्रमुख अक्षय तोरडमल, नाझीम काझी, महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख चंदनबाला बोरा, सुलोचना दुशी, शिवाजी नवले नवले, पोपट धनवडे, सुद्रीक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

यावेळी यादव पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत भाजपबरोबर राज्यात बनविलेले सरकार आणि आमची शिवसेना खरी असल्याचा केलेला दावा कर्जत तालुक्यातील शिवसैनिकांना मान्य नाही. आम्ही सर्व बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासेबत असणार्‍या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे. त्यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील एकही शिवसैनिक नाही. तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी कर्जत तहसील कार्यालयामध्ये शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र तयार करून ते मुंबई येथे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्यामार्फत पाठविले आहे.

जामखेडचे तालुकाप्रमुख संजय काशीद म्हणाले, जामखेड तालुक्यातूनही मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तयार करून सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत हे सांगितले आहे.
जामखेड तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत.

Back to top button