संगमनेर : वाहनाच्या धडकेत बिबट्या झाला जखमी

संगमनेर : वाहनाच्या धडकेत बिबट्या झाला जखमी
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जावळेवस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्या जखमी झाला असल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जावळेवस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी होऊन महामार्गावर पडला होता.

त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी जखमी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच टोलनाक्याचे कर्मचारी, पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी बिबट्या महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन बसला. त्यामुळे काहीवेळ वाहतूकही ठप्प झाली होती.

जखमी बिबट्यास ताब्यात घेण्यासाठी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याच्या जवळ पिंजरा नेला असता तो पिंजर्‍यात अलगद गेला. त्या बिबट्यास जखमी अवस्थेत संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. तेथे त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले.
वन विभागाने ठोस उपाययोजना करावी.

काही दिवसांपूर्वीच चंदनापुरी घाटात कारच्या बोनेटमध्ये बिबट्या अडकून गंभीररित्या जखमी झाला होता. आता पुन्हा चंदनापुरी घाटाजवळ असलेल्या जावळे वस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्या जखमी झाला आहे. त्यामुळे महामार्ग बिबट्यांसाठी घातक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. या बिबट्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news