ऑगस्ट कोरडाठाक ! महिनाभरात अहमदनगर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस

ऑगस्ट कोरडाठाक ! महिनाभरात अहमदनगर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जून, जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातदेखील पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात ऑगस्ट कोरडाठाक महिना ठरला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी 95.4 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, या महिन्यात फक्त 24.5 मिलिमीटर पावसावर समाधान मानावे लागले आहे. या महिन्यात तब्बल 75 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यांतील पावसाची सरासरी 193.9 मिलिमीटर एवढीच राहिली आहे.

अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाच आहे. पण सप्टेंबर महिन्यात सरासरी 147 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असून, तो झाला नाही, तर रब्बीच्याही आशा मावळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वांचेच आता सप्टेंबर महिन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात गेली सलग चार वर्षे दमदार पाऊस झाला. त्यामुळे चार वर्षे खरीप आणि रब्बी हंगाम जोमात होते. धरणेदेखील ओव्हर-फ्लो झाली होती. त्यामुळे सिंचन आणि पिण्यासाठी जिल्हाभर पाणीच पाणी होते. चार वर्षांनंतर यंदा मात्र जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार दिलासा देणारा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणी शंभर टक्के होण्यास मदत झाली.

मात्र, ऑगस्ट महिन्यात सरासरी 95.4 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र या महिन्यात शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. फक्त 24.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट अधिकच गंभीर झाले आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी 147 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. या महिन्यात अपेक्षित पाऊस झाल्यास दुष्काळी स्थितीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच सामान्य नागरिक आणि जिल्हा प्रशासनाचेही डोळे पावसाकडे लागले आहेत.

जिल्ह्यात जूनपासून तीन महिन्यांत सरासरी 193.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरी 112 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. कमी पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला तरच खरीप हंगामातून हाती काहीतरी लागण्याची शक्यता आहे. दमदार पावसाअभवी भूजलपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन महिन्यांत पाणीटंचाई ऊग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच टँकरची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

राहुरीत सर्वांत कमी, अकोल्यात सर्वाधिक

आजअखेर राहुरी तालुक्यात सर्वांत कमी 24.6 मिलिमीटर आणि श्रीरामपूर तालुक्यात 25.2 टक्के पाऊस झाला आहे. सर्वांत अधिक 63 टक्के पावसाची नोंद अकोले तालुक्यात झाली आहे.

सरासरी पाऊस कंसात गेल्या वर्षीची नोंद)

नगर 213.2 (359.7), पारनेर 180.7 (375.8), श्रीगोंदा 193.4 (363.4), कर्जत 200.1 (366.4), जामखेड 307.9 (356.3), शेवगाव 228.5 (349.2), पाथर्डी 261.9 (341), नेवासा 190.6 (333.9), राहुरी 106.1 (357), संगमनेर 113.4 (348.3), अकोले 305.6 (643.7), कोपरगाव 133.4(420), श्रीरामपूर 116.4 (366.9), राहाता 163.1 (363.9 ).

गेल्या वर्षीच्या तुलनेत 42 टक्के कमी पाऊस

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरी 306 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, फक्त 193.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत फक्त 64 टक्के पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 382.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एकूण वार्षिक पावसाच्या तुलनेत 85.44 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र 42 टक्के पाऊस कमी झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news