नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रीडांगण विकास योजनेतील तब्बल साडेचार कोटींची कामे कोणी व कोणाला दिली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असतानाच, आता ज्या मैदानांची कामे झाली, त्याचे इस्टिमेट कोणी तयार केली, यावरूनही जिल्हा नियोजन विभाग, क्रीडा विभाग व शिक्षण विभागात टोलवाटोलवी सुरू आहे.
क्रीडांगण विकास योजनेतून जिल्ह्यातील 64 शाळांच्या मैदान दुरुस्तीसाठी प्रत्येकी 7 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, संबंधित कामे ही ऑफलाईन पद्धतीने दिली गेली असावी, अशी चर्चा होती. परंतु, शाळेच्या बँक खात्यावर निधी येत असतानाही त्यांनी ही कामे आपण दिली नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणाची वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यातून, क्रीडा विभागाने ही कामे आपण दिली नसून ती शाळांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. तर शाळांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.
काम करताना त्याचे इस्टिमेट बनविणे गरजेचे असते. मात्र, इस्टिमेटबद्दल नियोजन विभागाकडे विचारणा केली असता, संबंधित अधिकारी भदाणे यांनी 'त्या'ं कामांचे इस्टिमेट क्रीडा विभागाकडून केली जातात, असे सांगितले. तर जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी शाळा कामांची इस्टिमेट आमच्याकडून होत नाहीत. ती संबंधित शाळा तयार करतात, असे उत्तर दिले. याशिवाय शिक्षण विभागातील काही मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता, आमच्याकडून फक्त कोरे लेटरहेड घेतले आहेत आणि काही कोेरे चेक दिले आहेत. या व्यतिरक्त आम्हाला तरी अन्य काही माहिती नाही, असे कळविले.