

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानांतरण बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून एकाच टेबलवर असलेल्या 50 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचार्यांना आता अन्य विभागात हलवले जाणार आहे. झेडपीच्या कर्मचार्यांच्या मे महिन्यात बदल्या झाल्या आहेत. तेव्हांपासून स्थानांतरण बदल्यांकडे लक्ष लागलेले होते. पाच वर्षे एकाच विभागात काम करणार्या, तसेच तीन वर्षे एकाच टेबलवर काम पाहणारे कर्मचारी हे स्थानांतरण बदलीस पात्र आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे स्थानांतरण झाले नव्हते. त्यामुळे अनेक कर्मचारी बदलीस पात्र असुनही आजही 'त्या' टेबलवरच दिसून येतात. यावर्षी मात्र स्थानांतरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या विभागातून स्थानांतरण करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
त्यानुसार आता कार्यालयीन अधिक्षक, कक्ष अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक या चार संवर्गातील बदलीपात्र सुमारे 50 पेक्षा अधिक कर्मचार्यांचे स्थानांतरण केले जाणार आहे. विशेषतः बांधकाम विभागासह महिला व बालकल्याणकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
स्थानांतरण प्रक्रियेत एका विभागातून दुसरीकडे हलवल्या जाणार्या कर्मचार्यांना 'चांगल्या' टेबलची अपेक्षा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांसह काही राजकीय नेतेमंडळींकडुन तसा प्रयत्न व्हावा, यासाठी 'ते' कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यातून 'बांधकाम'साठी घोडेबाजार' होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली असतानाही काही कर्मचारी झेडपीत कार्यरत आहेत. तत्कालीन सदस्यांनी मर्जीतील कर्मचार्यांना सेवावर्गच्या नावाखाली झेडपीत आणून बसवले आहे. यामुळे संबंधित कर्मचार्याची ज्या ठिकाणी बदली आहे, तेथे तो नसल्याने कामावर परिणाम दिसून येतो. अशा कर्मचार्यांनाही मूळ जागेवर हलवले जाणार का? याकडेही लक्ष आहे.
साधारणतः 290 कर्मचार्यांच्या मे महिन्यात बदल्या झाल्या. त्यांना 31 मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश होते. मात्र पीआरसी दौर्यात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी काही कर्मचारी आवश्यक असल्याने त्यांना सोडले नव्हते. आता पीआरसीचे संकट दूर झाल्याने 'ते' कर्मचारी देखील 30 जूननंतर रवाना केले जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर म्हणाले.