

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : गुन्हेगारीचे 'क्राईम हब' अशी श्रीरामपूरची ख्याती महाराष्ट्रभर आहे. प्रथमतः चोर्या मार्यासाठी प्रसिध्द असलेले श्रीरामपूर गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या अग्रस्थानी पोहचलेले आहे. आता नव्याने 'गावठी कट्ट्यांचे माहेरघर' असे श्रीरामपूरची नव्याने ओळख झालेली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये हॉटेल राधिका परिसरात आठ कट्टे व 10 जिवंत काडतुसे सापडले होते. त्यानंतर पुन्हा खैरीनिमगाव येथे काल गावठी सापडलेला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी एकाला गजाआड केलेले आहे. काल (दि. 27) रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांना खैरी निमगाव परिसरात एक जण गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती खबर्याकडून मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना देऊन पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते.
त्यानुसार पो. नि. खाडे हे आपल्या कर्मचार्यांसह या परिसरात आले. चितळी रोडवर असणार्या साई समर्थ मंगल कार्यालय परिसरात त्यांनी सापळा रचला. या ठिकाणी प्रशांत ऊर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे (रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपूर) हा संशयितरित्या फिरत असताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली असता त्याने या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. आरोपी लेकुरवाळे याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा तसेच दोन जीवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ त्याला गजाआड केले.
पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो. कॉ. अनिल शेंगाळे, पो.कॉ. सुनील दिघे व चांदभाई पठाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला. निमगाव खैरी येथील शिवारातील खैरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालया जवळ आरोपीस जेरबंद केले. पकडलेल्या आरोपी विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरचा कट्टा त्याने कोणाकडून खरेदी केला याची माहिती पोलिस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या एका वाईन शॉपीच्या बाजूला असणार्या एका हॉटेलात दोघे जण मद्य प्राशन करण्यासाठी आले होते. मद्य घेत असताना त्यांनी आपल्या जवळील गावठी कट्टे त्यांनी थेट टेबलावर ठेवले. त्यामुळे आजूबाजूच्या ग्राहकांमध्ये घबराट उडाली. सदरची माहिती मिळाल्यानंतर पोलिस या ठिकाणी आले. परंतु तत्पूर्वीच या दोघांनी या ठिकाणाहून पलायन केले. पोलिसांनी वाईन शॉपमधील सीसीटीव्ही तपासून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.