नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर भीषण अपघात

Accident
Accident

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील साईनाथनगर ते नेवासा बुद्रूक येथील मधल्या रस्त्यावर केळी व्यापार्‍याचा टेम्पो उलटल्याने एक जण जागीच ठार झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी आठच्या दरम्यान घडली.

मिर्झा खलिल छोटू बेग (वय 56, रा.खुलताबाद, जि.औरंगाबाद) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मिर्झा युन्नस शेख (वय 42), मिर्झा बब्बू शेख (वय 35), इम्रान शेख (वय 28), सोहेल सलिम शेख (वय 21), मुक्तार अहमद शेख (वय 35), मिर्झा फैंग बेग (वय 24), इब्राहिम शेखचंद शेख (वय 35), मिर्झा फरुद्दीन बेग (वय 22, सर्व रा. खुलताबाद, जि.औरंगाबाद) हे जखमी झाले आहेत. जखमींवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील केळी व्यापार्‍याचा टेम्पो केळी आणण्यासाठी नेवाशाकडे येत होता. साईनाथनगरहून नेवासा बुद्रूककडे येत असताना हा टेम्पो रस्त्यावर अचानक पलटी झाला. या टेम्पोने दोन पलट्या घेतल्या. या अपघाताची माहिती मिळताच नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे व पोलिस नाईक बबन तमनर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

या प्रकरणी टेम्पोचालक अमीन युसूफ पठाण याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील मयत मिर्झा खलील छोटू बेग यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामण रुग्णालयात करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बबन तमनर करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news