

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाचे आगमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.त्यामुळे खरीप पेरण्यांनाही आता वेग येणार आहे. कालअखेर 38 हजार 454 हेक्टरवर 9 टक्के पेरण्या झाल्या असून, यामध्ये कपाशीची 20 हजार हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात यावर्षी वेळेवर मान्सूनची हजेरी लागली नाही. त्यामुळे खरीप पेरण्याही लांबल्याचे पहायला मिळाले. अनेक शेतकर्यांनी शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पावसाची वाट न पाहता कपाशी लागवडी केल्या. काही भागात थोड्याफार ओलीवर सोयाबीन पेरण्या झाल्या. मात्र, चांगला पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते.
तर, बहुतांशी शेतकर्यांनी पावसाअभावी पेरण्यांचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे जून शेवटच्या टप्प्यात आला, तरीही अद्याप पेरण्यांना अपेक्षित गती मिळालेली नव्हती. अजुनही भात लागवडी सुरू झालेल्या नाहीत, खरीप ज्वारीही पेरणी सुरू झालेली नाही. दरवर्षी सव्वा लाख हेक्टरवर असलेली बाजरी पेरणीही कमी प्रमाणात दिसत आहे.
कालअखेर 4079 हेक्टरवर बाजरी पेरणी झाली असून, हे प्रमाण अवघे 2.90 टक्के इतके आहे. सोयाबीन बाबतही उदासिन परिस्थिती आहे. दरवर्षी 54 हजार 294 हेक्टरवर सोयाबीन पिक घेतले जाते. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने केवळ 3810 हेक्टरवर ही पेरणी झाली असून, ही टक्केवारी केवळ 7 इतकी आहे. कपाशी लागवडीला गती येतानाचे चित्र आहे. कपाशीचे 1 लाख 14 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असते. यावर्षी या क्षेत्रात किमान 10 हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.
मात्र, मान्सूनला विलंब झाल्याने लागवडी खोळंबल्या होत्या. त्यामुळे सध्या 16.78 टक्के अर्थात 19 हजार 188 हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. गेल्या आठवड्यापासून काही भागात पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यायोग्य ओल झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच भागात शेतकर्यांची पेरण्यासाठी लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.
पीक क्षेत्र हे. टक्के
बाजरी 4071 2.90
तूर 1705 11.28
मूग 6220 15.40
उडीद 1622 9.22
सोयाबीन 3810 7.00
कापूस 19188 16.78