नगर : जालंधरमधील पसार आरोपी शिर्डीत जेरबंद | पुढारी

नगर : जालंधरमधील पसार आरोपी शिर्डीत जेरबंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : पंजाब राज्यातील जालंधर येथे खुनाचा प्रयत्न करुन जिल्ह्यातील शिर्डी येथे लपलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अटक केलाला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द पंजाब राज्यात दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पुनित ऊर्फ पिम्पू बलराज सोनी, (27, रा. शहिद बाबुलालसिंग नगर, जालंधर, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध जालंधर येथे गंभीर गुन्हे दाखल असून अनेक दिवसांपासून ओळख लपवून व राहण्याची ठिकाणे बदलून आरोपी पंजाब पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतर पंजाब गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक इंद्रजितसिंह यांनी महाराष्ट्र पोलिस यांच्याशी पत्रव्यवहार करून फरार आरोपीचा शोध घेण्याची विनंती केली होती.

मृतांच्या हडपलेल्या जमिनी सरकार घेणार ताब्यात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

त्यानुसार अहमदनगर पोलिसांना सदर आरोपीचा शोध घेण्याचे आदेश प्राप्त झाले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना फरार आरोपी शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दोन विशेष पथकांना सोबत घेवून शिर्डीतील 133 हॉटेलची तपासणी केली. तपासणी दरम्यान हॉटेल निर्मल इन लॉजमध्ये एका संशयित इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदर इसमाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे नाव पुनित ऊर्फ पिम्पू बलराज सोनी असल्याचे सांगितले व गुन्ह्यांची कबूली दिली. पंजाब पोलिसांचे विशेष पथक तत्काळ शिर्डी येथे येवून आरोपीस पुढील कारवाईसाठी घेवून गेले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Back to top button