मृतांच्या हडपलेल्या जमिनी सरकार घेणार ताब्यात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

मृतांच्या हडपलेल्या जमिनी सरकार घेणार ताब्यात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी , पुढारी वृत्तसेवा :  बनावट कागदपत्रांद्वारे मृत नागरिकांच्या हडपलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली.

बनावट कागदपत्राद्वारे जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथका (एसआयटी) कडून प्रकरणांचा आढावा घेतला जात आहे. नवी नवी प्रकरणे उघड होत आहेत. जमीन हडप प्रकरणी आत्तापर्यंत दोघांना अटक झालेली आहे. आणखीही काहीजण लवकरच गजाआड होतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जमिनीचे मूळ मालक हयात नसलेल्या ज्या मालमत्ता बेकायदेशीररीत्या विकण्यात आलेल्या आहेत त्या ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . एसआयटी अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. लोक आता स्वत:हून वैयक्तिक तक्रारी घेऊन येऊ लागले आहेत.

जमिनी बळकाव आणि बेकायदा जमिनी हस्तांतरणाची जी काही प्रकरणे सध्या एसआयटी हाताळत आहेत त्या प्रकरणांचे स्वरूप व्यापक आहे. तपासकाम योग्य दिशेने चालले आहे, असे सांगून माझ्याकडे तक्रारी घेऊन येणार्‍यांना मी थेट एसआयटीकडे किंवा पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी सादर करण्याचे आवाहन करीत आहे.

नोकरी धंद्यानिमित्त विदेशात स्थायिक झालेले गोमंतकीय किंवा जे कोणी मृत पावले आहेत, त्यांच्या जमिनी खोटे दस्तऐवज तयार करून लाटण्याचे प्रकार होत आहेत. या जमिनी सरकार विकू देणार नाही. एसआयटी अशा प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Back to top button