नगर शहर शिवसैनिकांचा निर्धार ! उद्धवच साहेब..

नगर शहर शिवसैनिकांचा निर्धार ! उद्धवच साहेब..
Published on
Updated on

नगर :  पुढारी वृत्तसेवा : नगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसून भगवा फडकविण्यासाठी ज्यांनी 'मोला'ची भूमिका बजावली, असे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधात बंड पुकारल्यानंतर नगर शिवसेनेचा ठाकरी बाणा आजही कायम असल्याचा निर्धार नगरच्या शिवसैनिकांनी व्यक्त केला.

नगर शहरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला पाठबळ न देता, पक्षप्रमुख ठाकरे यांचाच आदेश पाळणार असल्याचे 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले. नगर शहर आणि मंत्री एकनाथ शिंदे एक अतुट समिकरण आहे. जेव्हा-जेव्हा नगर शहर शिवसेना संकटात सापडली, तेव्हा-तेव्हा शिवसैनिक ठाण्यात भाईंकडे मदतीसाठी गेले.

भाईंनीही नगरच्या शिवसैनिकांना मदत केल्याचा इतिहास आहे. एकनाथभाईंमुळेच नगर महापालिकेवर तीनदा भगवा फडकला अन् सत्तेची फळे शिवसेनेला चाखता आली. शीला शिंदे यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी एकनाथभाई नगरला तळ ठोकून होते.
आज त्याच भाईंनी आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारत 'मातोश्री'लाच आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरच्या राजकीय बंडाळीने नगर शिवसेना सुरुवातीला पेचात पडल्याचे दिसून आले.

मात्र आज नगरच्या शिवसैनिकांनी एकनाथभाईंऐवजी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला आहे. काहींनी शिंदे आजही शिवसेनेत असल्याचे सांगत त्यांच्या पुढील भूमिकेनंतर बोलू, असे सांगितले.

मंत्री शंकरराव गडाख मुंबईतच!
क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक जिंकताच शंकरराव गडाख यांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेनेने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देत परतफेडही केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडात ठाकरे सरकारमधील चार मंत्री सहभागी झाले असले, तरी मंत्री शंकरराव गडाख यांनी मात्र मुंबईतच (ठाकरेंसोबत) राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही मंत्री गडाख यांनी हजेरी लावली.

तीन बहिणी अन् भाई
शीला अनिल शिंदे, सुरेखा संभाजी कदम आणि विद्यमान महापौर रोहिणी संजय शेंडगे यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाईंचा 'मोला'चा वाटा आहे. शिवसेनेची सत्ता यावी, यासाठी भाईंनी या तिन्ही बहिणींना ताकद देत नगरच्या महापालिकेत भगवा फडकाविल्याचा इतिहास आहे. मात्र, आज या तिन्ही बहिणींच्या पतीदेवांनी शिंदे यांच्याऐवजी ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय जाहीर करत सेनेशी असलेल्या एकनिष्ठतेला महत्त्व दिल्याचे अधोरेखित झाले आहे.

शिवसेनेला अनेक बंडाचा अनुभव आहे. बंड केल्यानंतर काय होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे उद्या काही राजकीय घडामोडी झाल्या, तरी आम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार.
शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना.

काहीही राजकीय घडामोडी घडल्या, तरी आम्ही शिवसेनेसोबत राहू, यावर उद्या शिवसेनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहोत.
संभाजी कदम, शहरप्रमुख शिवसेना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news