

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुल उभारणीसाठी14 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी 268 कोटी निधी आणला आहे.
कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी 131.24 कोटी निधी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला आहे. त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होवून बाजारपेठेला आलेली मरगळ याची दखल घेऊन शहरातील रस्ते व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यवधी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर शहराचे रूपडे बदलू लागले आहे.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एप्रिल महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार कोपरगाव दौर्यावर आले असता त्यावेळी देखील ना. काळे यांनी बस स्थानका लगतच्या व्यापारी संकुलासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा मंत्री पवार यांनी निधी देण्याची ग्वाही ना. काळे यांना दिली होती.
दिलेला शब्द पवार यांनी पूर्ण करून कोपरगाव शहर बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी 14 कोटी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल ना.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आभार मानले आहे. व्यापारी संकुलाच्या माध्यमातून शहरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.