सांगली : हरिपुरात सहा कोटींचा गंडा; ७० जणांचा समावेश | पुढारी

सांगली : हरिपुरात सहा कोटींचा गंडा; ७० जणांचा समावेश

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बाजारभावापेक्षा कमी दराने स्टील देण्याचे आमिष दाखवून 5 कोटी 70 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याबाबत विकास मनोहर बोंद्रे (रा. हरिपूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिवानंद दादू कुंभार (वय 47, रा. यड्राव, ता. शिरोळ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोंद्रे यांचा हरिपूरमध्ये बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. संशयित कुंभार याचाही व्यापार आहे. मे 2021 ते 18 जून 2022 दरम्यान संशयित कुंभार याने बोंद्रे यांच्या हरिपूर येथील दुकानात येऊन वेगवेगळ्या स्टील व सिमेंट कंपनीची मला डीलरशिप मिळाली आहे. प्रोजेक्टच्या कामाकरिता माल पुरवणार आहे. बाजारभावापेक्षा दहा रुपये कमी दराने स्टील, तर 50 रुपये कमी दराने सिमेंट देणार असल्याचे त्याने फिर्यादी बोंद्रे यांना सांगितले. बोंद्रे यांचा त्याने विश्‍वास संपादन केला. पहिली 50 टन स्टीलची ऑर्डर घेऊन ऑर्डरप्रमाणे बोंद्रे यांना स्टील दिले.

त्यानंतर संशयित कुंभार याने वेळोवेळी फिर्यादी बोंदे्र व इतर 70 जणांना स्टील कमी दराने पुरवतो, असे सांगून त्यांच्याकडून 1100 टन स्टील खरेदीची ऑर्डर घेतली. त्याच्या बदल्यात 5 कोटी 70 लाख 62 हजार 500 रुपये रोख घेतले. मात्र, त्यानंतर फिर्यादी बोंद्रे व इतर 70 जणांना स्टीलचा पुरवठा केला नाही व रकमेचा अपहार केला. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बोंदे्र यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित शिवानंद कुंभारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button