राहुरी :‘त्या’ केंद्राकडून ग्राहकांना लाखोंचा गंडा | पुढारी

राहुरी :‘त्या’ केंद्राकडून ग्राहकांना लाखोंचा गंडा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा:  राहुरी शहरामध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक सेवा केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. परंतु, संबंधित ठिकाणी बँकेच्या ग्राहकांच्या बँक खात्यामधील रकमांमध्ये अफरातफर होऊन सुमारे 10 ते 15 लाखांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. बँक खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रारीसाठी संबंधित राष्ट्रीयकृत बँक व पोलिस ठाण्यात दस्तक दिली. परंतु, संबंधित नुकसान झालेल्या ग्राहकांना न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे.

राहुरी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेमार्फत खासगी व्यक्तींकडून ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. संबंधित ग्राहक सेवा केंद्रामध्ये दैनंदिन शेकडो ग्राहक छोटे-मोठे व्यवहार करतात. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेक जण ग्राहक सेवा केंद्रामध्येच आपले व्यवहार करीत होते. दरम्यान, काही दिवसांपासून संबंधित ग्राहक सेवा केंद्रामध्ये काही ग्राहक पैशांची देवाण-घेवाण करीत असताना ग्राहक सेवा केंद्रामध्ये अडाणी ग्राहकांची लूट झाल्याचे दिसून आले आहे.

Agnipath scheme : पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे ते समजत नाही; राहुल गांधींचा टोला

अनेक वयोवृद्ध, विधवा, गोरगरीब व्यक्तींच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यांचा तपशील, थंब घेतल्यानंतर परस्पर व्यवहार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सुमारे 10 ते 15 लाखांचा हा घोटाळा असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

बँकेकडे अनेक ग्राहकांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. अनेक ग्राहकांनी एकत्र येत बँकेचे शाखाधिकारी व पोलिस ठाण्यामध्ये आपली कैफियत मांडली आहे. ग्राहक सेवा केंद्राकडून माफीनामा आल्यानंतर काही ग्राहकांना पैसे परत देण्याची हमी देण्यात आली. तर काही ग्राहकांनी थेट तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेत बँकेकडे आपल्या खात्यावरील परस्पर व्यवहाराबाबत न्याय मागितला आहे.

एका ग्राहक सेवा केंद्रामध्ये हा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालविणार्‍यांकडे ग्राहक वर्ग आता शंकेच्या नजरेने पाहू लागला आहे. एका व्यक्तीच्या चुकीच्या पश्चाताप हा सर्वच ग्राहक सेवा केंद्र चालकांना करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. तर परस्पर बँक खात्यातून पैसे काढणार्‍यांवर गुन्हा दाखल होऊन लुटलेले पैसे परत मिळावे, अशी मागणी होत आहे.

तीन लाखापर्यंत तक्रारी मिळाल्या
पैसे गायब झालेल्या अनेक ग्राहकांनी तक्रार देण्यास सुरूवात केली आहे. तीन लाखांपर्यंत पैसे गायब झाल्याच्या तक्रारी बँकेला मिळाल्या आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत. परस्पर बँक खात्यातून पैसे काढणे हा मोठा गुन्हा असून ग्राहकांना नुकसान झालेले पैसे परत मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याची माहिती संबंधित बँक शाखेचे शाखाधिकारी यांनी दिली आहे.

राष्ट्रीयकृत बँकांचे ग्राहक सेवा केंद्र सुरू आहे. परंतु, संबंधित ग्राहक सेवा केंद्रामध्ये अशा पद्धतीने पैशाची अफरातफर होत असल्यास त्या खासगी कंपनीकडून बँकेला पैसे वसुलीचा अधिकार आहे. ग्राहकांचे लुटलेले पैसे परत मिळून देण्यासाठी संबंधित राष्ट्रीयकृत बँक प्रयत्न करत असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

Back to top button