शहीद जवानांचे स्मारक उभारणार : पोटघन | पुढारी

शहीद जवानांचे स्मारक उभारणार : पोटघन

पारनेर : पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील अनेक लष्करी जवान सैन्यामध्ये काम करत असताना शहीद झाले असून, त्यांचा सन्मान करण्यासाठी पारनेर तालुक्यात अद्ययावत शहीद जवान स्मारक उभारणार असल्याची माहिती आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी दिली. तसेच, नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आजी-माजी सैनिकांसाठी कार्यालय उभारण्यात येणार असून, त्याच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील आजी-माजी सैनिकांना विविध शासकीय योजना व सवलती याचा लाभ मिळण्यासाठी अमृत जवान सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे. पारनेर तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पोटघन व संघटनेचे मार्गदर्शक कर्नल साहेबराव शेळके, तसेच सर्व सभासदांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, तसेच सर्व अर्धसैनिक बळ यांच्या अडचणी, तक्रारींबाबत तहसीलदार कार्यलयात जमा केलेल्या अर्जांवरील कार्यवाहीविषयी माहिती घण्यात येणार आहे, तसेच काही नवीन अर्ज मागविण्यात आले आहेत, ते जमा करणे. एनडीए तसेच एसएसबीबाबत विद्यार्थ्यांसाठी कर्नल साहेबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा होणार आहे.

पावसाळा सुरू झाल्याने पुढील एक महिना दोन टप्प्यात वृक्षारोपण केले जाणार आहे. तालुका वृक्षारोपणाचा कार्यक्रम चुंभळेश्वर मंदिर परिसरात करण्यात येणार आहे. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस समारंभ होईल.

 

 

Back to top button