शिक्षक बदल्यांची लगीनघाई सुरू, बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

शिक्षक बदल्यांची लगीनघाई सुरू, बदल्यांचे वेळापत्रक जाहीर
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा:  गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेस यंदा वेग आला आहे. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदलीकरीता शासनस्तराहून ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीवर प्राथमिक शिक्षक बदलीकरिता शासनाकडून वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र, कोरोना सावट कमी झाल्याने यंदा ह्या बदल्या करण्यासाठी शासन अनुकूल दिसले. शिवाय बदल्या पारदर्शी करण्यासाठी एक सॉफ्टवेअरही विकसित केले आहे. त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे दिसले.

नुकतीच बदली पोर्टलवर अवघड शाळांची यादी प्रसिद्ध झाली आहे. 13 ते 20 जून बदली पोर्टलवर शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट करणे, 14 ते 24 जून शिक्षकांनी शिक्षण अधिकार्‍यांकडे अपील सादर करणे, 14 ते 26 जून शिक्षणाधिकार्‍यांनी अपील तपासणे, 14 ते 28 जून शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारणे, 29 जून ते 1 जुलै गटशिक्षण अधिकार्‍यांनी सक्तीची स्वीकृती करणे, 24 जून ते 3 जुलै शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे आणि 4 व 5 जुलै सीईओ सार्वजनिक आक्षेपांची सुनावणी घेणे, अशाप्रकारे बदलीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी शिक्षक बदल्यांना मुहूर्त सापडल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या चेहर्‍यावर समाधान झळकत आहे, तसेच अवघड आणि दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

365 शाळा 'अवघड'; यादी अपलोड

शिक्षण विभागाने बदली प्रक्रियेसाठी 2017 मध्ये तयार केलेली आणि 2019 च्या बदली प्रक्रियेत विचारात घेतलेल्या अवघड शाळांची यादी या बदल्यांसाठीही गृहीत धरली आहे. शिक्षक बदल्यांच्या पोर्टलवर संबंधित 365 शाळांची यादी अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मिळाली. दरम्यान, अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही यादी शिक्षक स्वीकारणार की यावरही काहींचा आक्षेप असेल, हे लवकरच पहायला मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news