संगमनेरला पाणी योजनांसाठी 616 कोटी

संगमनेरला पाणी योजनांसाठी 616 कोटी

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस विधिमंडळ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध योजनांसाठी सातत्याने मोठा निधी मिळाला आहे. तालुक्यातील तळेगाव, घुलेवाडी, निमोण, चंदनापुरी, वरवंडी, निमगाव यांसह पाणीपुरवठा योजनांसाठी 616 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

या अंतर्गत 76 गावे व 406 वाड्या- वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था होणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांबाबत अधिक माहिती देताना इंद्रजित थोरात म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध विकासाच्या योजना सुरू आहेत.

संगमनेर शहरात येणार्‍या चारही मुख्य बाजूंच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण सुरू आहे. याचबरोबर माझे घर सोसायटीजवळ नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलासाठी निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील 76 गावे व 406 वाड्या-वस्त्यांकरिता 616 कोटी रुपये मिळाले आहेत.

या अंतर्गत चंदनापुरी पाणीपुरवठा योजनेसाठी 60 कोटी, तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 81 कोटी, घुलेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 81 कोटी, वरवंडी पाणीपुरवठा योजनेसाठी 33 कोटी, निमगाव बुद्रूक व चंदनापुरी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रत्येकी 60 कोटी रुपये, निमोण अशा विविध पाणीपुरवठा योजनांचा यात समावेश आहे. यासह पाझर तलाव दुरुस्तीसाठी 32 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
या अंतर्गत तालुक्यातील विविध गावांमधील पाझर तलाव दुरुस्ती होणार आहे. यामुळे येत्या पावसाळ्यातील पाणी साठवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

सातत्याने विकास कामे हाच ध्यास घेऊन मंत्री बाळासाहेब थोरात काम करत आहे. निळवंडे कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत. येत्या ऑक्टोबरमध्ये तळेगावसह दुष्काळी भागाला पाणीपुरवठा होण्यासाठी काम होत आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी त्या-त्या गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी मोठा पाठपुरावा केल्याचे इंद्रजित थोरात म्हणाले.

logo
Pudhari News
pudhari.news