नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या…..पण निकाल मात्र !

नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या…..पण निकाल मात्र !

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा

12 वीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भितीने निकालाच्या आदल्यारात्री एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे घडली. कुणाल प्रकाश चौधरी (वय 17 वर्षे) असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो 12 वी शास्त्र शाखेत शिकत होता. राहुरी येथील आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचा तो विद्यार्थी होता.

कुणाल 12 वीच्या परीक्षेनंतर पास होईल की नाही, या विवंचनेत असायचा. निकालाची तारीख जवळ येत होती, तस-तशी त्याची घालमेल होत होती, परंतु त्याने कधी कोणाला ही बाब बोलून दाखवली नाही. वागण्यातून कोणाला जाणवूही दिली नाही. दरम्यान, 8 जून रोजी 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाली. 7 तारखेला निकालाच्या आदल्या रात्री सर्वांसमवेत जेवण करून कुणाल अभ्यासाच्या खोलीत झोपण्यास गेला. रात्री उशिरा वडिलांना पिण्यास पाणी आणून दिले व त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला.

बुधवारी सकाळी 7 वाजले तरी कुणाल का उठला नाही, हे पाहण्यास आई सुवर्णा यांनी खिडकीतून डोकावले असता कुणाल फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. भयावह प्रसंग डोळ्यासमोर पाहून ती माता गलितगात्र झाली. तिने मोठ्याने हंबरडा फोडल्याने शेजारी जमा झाले. तत्काळ या दुर्घटनेची माहिती वांबोरी पोलिसांना दिली. कुणालचा मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कुणालच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पो. ह. दिनकर चव्हाण, पो. कॉ. जयदीप दबडे करीत आहेत.

आयुष्याच्या परीक्षेत नापास, पण… 12 वी पास!

12 वीच्या परीक्षेत नापास होईल, अशी भीती बाळगून असलेला कुणाल मात्र चांगल्या मार्कानी पास झाल्याचे आज निकालानंतर सिद्ध झाले. कुणालने अविचाराने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे नाहक जीव गमावला. कुणालाचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेला…!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news