

कराड : पुढारी वृत्तसेवा
आमची मुलीस 24 मे रोजी भाजले होते आणि तिचा उपचारावेळी 27 मे रोजी तिचा मृत्यू झाला. तिने पेटवून घेतले, यावर आमचा विश्वास बसत नाही. तिला पती व सासर्याने संगनमताने जाळून मारले असावे, असा आमचा संशय असल्याची तक्रार माण तालुक्यातील दानवेलवाडी येथील मृत विवाहितेच्या आईसह सैदापूर (ता. कराड) येथील तिच्या मामाने केली आहे. ही तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली असून आमच्या मृत मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
सुनिता कदम (आई) व अनिल शिंदे (मामा) यांनी याबाबतची तक्रार केली आहे. 12 मे 2019 रोजी सुनिता कदम यांची मुलगी प्रणाली हिचा विवाह विसापूर येथील अतुल साळुंखे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी प्रणालीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला होता. सासरे दारू पिऊन वारंवार सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत. तर पती अतुल आपल्या वडिलांचे ऐकून पत्नी प्रणालीस मारहाण करत, असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
मार्च 2022 मध्ये माहेरी जाऊन सोने घेऊन ये असे म्हणून हाकलून दिले होते. त्यानंतर एक महिना ती माहेरी होती. त्यानंतर सासरकडील काही मंडळी दानवलेवाडी येथे गेली होती. त्यांनी प्रणालीचा पती व सासरा यांना समजावून सांगतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यानंतर प्रणालीची इच्छा नसतानाही सासरी जावे लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा छळ सुरू करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीस अटक झाली असली तरी सासर्याला अटक करण्यात आलेली नाही, असे तक्रार अर्जात नमूद आहे. पोलिसांच्या भूमिकेबाबत व तपासाबाबत आमच्या मनात संभ्रम आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आमच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे मुलीची आई सुनिता नामदेव कदम व मामा अनिल शिंदे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे केली आहे.