

कर्जत : पुढारी वृत्तसेवा
माझी वसुंधरा अभियान 2 मध्ये नगरपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल काल शहरात मिरवणूक काढण्यात आली.
नगरपंचायतीबाहेर विजयी सभा घेण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार, मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, गटनेते संतोष मेहेत्रे, प्रसाद ढोकरीकर, सुनील शेलार, सचिन घुले,नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका ताराबाई कुलथे, ज्योती शेळके, छाया शेलार, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, लंकाबाई खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुनंदा पवार म्हणाल्या की, तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके अजूनही कायम आहेत. प्रत्येक वर्षी तापमान वाढत आहे. निसर्ग हा बदलत आहे. त्यामुळे वेळीच सर्वांनी सावध व्हावे. स्वच्छता व वृक्षारोपण या दोन्हींबाबत शहरातील नागरिक आघाडीवर आहेत. हाच उपक्रम सातत्याने पुढे सुरू ठेवावा. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून तालुक्यात 70 हजार झाडे आतापर्यंत लावण्यात आली. आमदार पवार हे देखील लक्ष ठेवून होते. सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांना एक आदर्श पायंडा निर्माण केला.
यावेळी मुख्याधिकारी जाधव म्हणाले की. माझी वसुंधरा अभियान एकमध्ये कर्जत नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. कोणत्याही परिस्थितीत प्रथम क्रमांक पटकावयचा या जिद्दीने सर्वजण काम करीत होतो. दादा पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, सर्व नागरिक, नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी रात्रं-दिवस अभियानात राबत होते.
त्यामुळेच खर्या अर्थाने हे यश मिळाले.नगराध्यक्ष उषा राऊत म्हणाल्या, हे यश कोण एकट्याचे नसून सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी, आमदार रोहित पवार व मार्गदर्शिका सुनंदा पवार, मुख्याधिकारी, नगरसेवकांचा यशात वाटा आहे.यावेळी उपनगराध्यक्षा रोहिणी घुले यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन बापू उकिरडे यांनी, तर आभार नगरसेविका छाया शेलार यांनी मानले.