आनंदॠषी पतसंस्थेतून चोरट्याने रोकड लांबविली | पुढारी

आनंदॠषी पतसंस्थेतून चोरट्याने रोकड लांबविली

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

संगमनेर शहरातील जाणता राजा रस्त्यावरील आनंदॠषी नागरी पतसंस्थेत अज्ञात चोरट्याने खिडकी तोडून आत प्रवेश करत पतसंस्थेतून 1 लाख 32 हजार लांबविले असल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जाणता राजा रस्त्यावर आनंदॠषी नागरी पतसंस्था हि नामांकित पतसंस्था आहे.

बुधवारी नेहमीप्रमाणे येथील कर्मचार्‍यांनी कामकाज आटोपल्यानंतर पतसंस्था बंद केली. दरम्यान काल सकाळी नेहमीप्रमाणे पतसंस्थेचे कामकाज सुरू करण्यासाठी कर्मचार्‍यांनी पतसंस्था उघडली असता आत चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदरील घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनस्थळी आले.

चोरीचा शोध घेतला असता चोरट्यांने खिडकी तोडून आत प्रवेश केले असल्याचे आढळून आले. या चोरट्याने सीसीटीव्हीचे डिव्हाईस चोरून नेले असल्याचे आढळून आले. इतर लॉकर व कपाटांना हात न लावल्याचे दिसून आले. परंतु, या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Back to top button