राहुरीत तनपुरे-विखे गटांचे सर्वस्व पणाला

two business people competing in arm wrestling
two business people competing in arm wrestling
Published on
Updated on

राहुरी :

राहुरी तालुक्याच्या राजकीय सारीपाटामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेला मोलाचे महत्व आहे. पंचायत समितीमार्फत मिनी आमदारकी तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रभाव राखण्यासाठी जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून देण्यासाठी राहुरी तालुक्यातील राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच अटीतटीची लढाई झाली.

पूर्वी जनसेवा व विकास मंडळाच्या माध्यमातून राजकीय पक्षाविरहित समविचारी राजकीय नेत्यांची मोट बांधली जात होती, परंतु विधान सभेचा मतदार संघ तुटल्यानंतर मंडळांना फाटा देत राजकीय पक्षाच्या चिन्हाला अधिक महत्व आले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विखे गटाने वांबोरी, ब्राम्हणी व टाकळीमिया गटामध्ये विजयी पताका झळकावली.

तनपुरे गटाने बारागाव नांदूर व सात्रळ या गटांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा रोवला होता. सर्वाधिक तीन गटामध्ये विखे गटाचा विजयी होऊनही गणांमध्ये मात्र 10 पैकी केवळ 4 सदस्य विखे गटाचे निवडून आले होते. राष्ट्रवादीने पंचायत समितीमध्ये 6 सदस्य निवडून आणत सत्ता राखली होती. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वामध्ये मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली होती. विखे- कर्डिले हे भाजपमध्ये यंदा एकत्र असल्याने राष्ट्रवादीच्या तनपुरे गटाला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

राहुरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी, भाजप पक्षासह सेना व काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी कसब पणाला लावले आहे. दुसरीकडे चारही मोठ्या पक्षांना आपली जागा दाखवून देण्यासाठी राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाईं (आठवले गट) वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनीही राजकीय क्षेत्रात श्रीगणेशा करण्यासाठी आपले पाय रोवण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाच गट व दहा गणांची रचना बदलली आहे. शासन निर्णयानुसार लोकसंख्येनुसार 5 गटांऐवजी 6 गट तर 10 गणांऐवजी 12 गणांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून सादर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यानुसार 6 गटांमध्ये नव्याने बारागाव नांदूर, टाकळीमिया, सात्रळ, वांबोरी हे जुने गट कायम राखत त्यामध्ये गावांची संख्या कमी जास्त झाली आहे तर ब्राम्हणी गटाचे वांबोरी व नव्याने तयार केलेल्या उंबरे गटामध्ये विलिनिकरण झाले आहे. गुहा या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे.

गणामध्ये ताहाराबाद व मांजरी या दोन गणांची निर्मिती झाली आहे. राहुरी तालुक्यामध्ये वर्चस्व राखण्यासाठी राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. राहुरीमध्ये विरोधी गटाची धार राखण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना विरोधी मोट बांधावी लागणार आहे. वांबोरी गटामध्ये ज्येष्ट नेते अ‍ॅड. सुभाष पाटील व उंबरे येथील तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे या दोघांनाही गटामध्ये सवतासुभा मिळाला आहे.

दोन्ही मातब्बर नेत्यांना वेगवेगळे गट लाभल्याने विखे गटासाठी उंबरे गट हा लाभदायी ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गुहा गटामध्ये साई संस्थानचे विश्वस्त तथा प्रेरणा संस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपले वर्चस्व दाखविण्याची नामी संधी असणार आहे. गट व गणाच्या प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी सात दिवसांचा कालावधी आहे. यानंतर अंतिम गट व गण रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा पेटणार असून ग्रामीण भागामध्ये आगामी लोकसभा व विधानसभेची तयारी म्हणून या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news