स्थानांतरण बदल्या: ‘बांधकाम’ खातोय ‘भाव’; 50 कर्मचारी हलविणार, टेबलसाठी जोरदार फिल्डिंग | पुढारी

स्थानांतरण बदल्या: ‘बांधकाम’ खातोय ‘भाव’; 50 कर्मचारी हलविणार, टेबलसाठी जोरदार फिल्डिंग

नगर : पुढारी वृत्तसेवा

प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्या झाल्यानंतर आता स्थानांतरण बदल्यांच्या हालचालींनाही वेग आला आहे. त्यात दक्षिण व उत्तरच्या ‘बांधकाम’साठी मोठी स्पर्धा सुरू झाली असून पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे विभागानेही चांगलाच ‘भाव’ खाल्ल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे.

पहिल्या ई-एसटी बसचे नगरमध्ये जंगी स्वागत

एकाच टेबलवर पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांची स्थानांतरण बदली केली जाते. सध्या विविध विभागांतील 39 कनिष्ठ सहायक, 10 वरिष्ठ सहायक आणि काही कक्ष अधिकार्‍यांचेही स्थानांतरण होणार आहे. त्यात अनेकांना नाईलाजाने टेबल सोडावे लागणार आहेत, तर काहींचा सहा महिन्यांपासूनच ‘त्या’ खुर्चीवर डोळा असल्याने ते स्थानांतरणकडे नजरा लावून आहेत. त्यासाठी ‘प्रशासना’कडे फिल्डिंग लावली जात आहे. विशेषतः बांधकाम दक्षिण आणि उत्तरेच्या टेबलसाठी अधिक ‘मागणी’ आहे. त्या खालोखाल पाणी पुरवठा, लघू पाटंबधारे विभागातील टेबलसाठीही मोठी रस्सीखेच वाढली आहे. येत्या दोन दिवसांत या बदल्यांचा ‘मुहूर्त’ ठरणार आहे.

दरम्यान, बांधकाम विभागात महिला कर्मचार्‍यास नेमणूक देणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाचे यामागचे गौडबंगाल काय, हे नियुक्त्या झाल्यावरच पुढे येणार आहे.

राहुरीतील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना! शहरात चोरट्यांचा सुळसुळाट

पंचायत राजमुळे स्थानांतरण पुढे ढकलणार?

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर स्थानांतरण बदल्यांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या जून महिन्यातच पंचायत राज दौरा असल्याने ही स्थानांतरण बदल्यांची प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. समिती गेल्यानंतर म्हणजे साधारणतः जुलैमध्ये स्थानांतरणाच्या बदल्या होणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून समजली आहे.

Back to top button