कोतूळमधून गौणखनिजाचे उत्खनन, कारवाई करण्याची मागणी  | पुढारी

कोतूळमधून गौणखनिजाचे उत्खनन, कारवाई करण्याची मागणी 

अकोले : पुढारी वृत्तसेवा

कोतूळ परिसरात पुलाच्या कामात भराव टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून बेकायदा माती, मुरूम काढण्याचे काम सुरू आहे. विना परवानगी खोदकाम करून निसर्गाची नासधूस करणारे भूमाफिया आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवर पुलाचे काम सुरू आहे.

परंतु पुलाच्या कामाच्या भरावासाठी माती व मुरुमाची आवश्यकता असल्याने ठेकेदाराने महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता शेतकर्‍यांचे शेत व डोंगराचे उत्खनन करत मोठी वाहतूक करताना दिसत आहेत. तालुक्यात महसूल विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यांचे पुन्हा फावले आहे.

पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसच्या डब्या खालून धूर; उडाली एकच खळबळ

दगड, वाळू, माती, मुरूम आदी उत्खनन करण्यासाठी पर्यावरण समितीचा परवाना अनिवार्य आहे. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी क्रशर, दगडाच्या खाणी चालवल्या जात आहेत. याला काही ठिकाणी महसूल खात्याचा आशीर्वाद मिळाल्याची चर्चा आहे.
गौण खजिन कायदेशीररीत्या रॉयल्टी भरून वाहतूक करणे बंधनकारक आहे.

मात्र, रॉयल्टी भरून वाहतूक करणार्‍यांचे प्रमाण कोतुळ परिसरात अत्यल्प आहे. महसूलच्या कारवाईत सातत्य दिसत नाही. अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे बेकायदेशीररीत्या गौण खनिजाची वाहतूक सर्रासपणे वाढत आहे. महसूलच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने भरधावपणे चालवली जातात.

shaunk sen : कोण आहे शौनक, ज्याने कान्समध्ये जिंकला गोल्डन आय ॲवॉर्ड

त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणार्‍या बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन व त्याच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडीत जात असल्याची चर्चा आहे.

कोतूळ परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत संबंधितांना पंचनामा करण्याची सूचना केली. मुरूम, मातीचे उत्खनन करणार्‍या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
                                                                     – सतीश थेटे, तहसीलदार, अकोले.

Back to top button