निवडणूक लांबणीवर,www.pudhari.news
अहमदनगर
पावसामुळे निवडणुका लांबणीवर; ऑक्टोबरमध्ये निवडणुकांचे संकेत?
नगर : पुढारी वृत्तसेवा
जून आणि सप्टेंबर हा सर्वाधिक पावसाचा कालावधी संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात होणारी परतीच्या पावसाची बरसात पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम बिघडविण्याची शक्यता आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपला आहे. त्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तत्काळ जाहीर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरू केला आहे.
दहा नगरपालिकांच्या प्रभागरचना 6 जूनला, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची अंतिम प्रभागरचना 27 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. प्रभागरचना पूर्ण झाल्यानंतर आरक्षण व मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकांसाठी जुलै तर जिल्हा परिषदेसाठी ऑगस्ट महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यास, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी उपलब्ध होणार असल्याचे आयोगाने नमूद केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत तत्काळ निवडणूक घेण्यात यावी.
कमी पावसाच्या जिल्ह्यात त्या सुरू करा, असे निर्देश दिले आहेत. नगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448 मि.मी. पावसाची नोंद होते. जून व सप्टेंबर या महिन्यांत जादा पावसाची नोंद आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात सरासरी 95 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. परतीच्या पावसाचा फटका ऑक्टोबर महिन्यात देखील बसला आहे. गेल्या दोन वषार्ंत सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या वा तिसर्या आठवडयात निवडणुका होण्याची शक्यता आहे. पावसाच्या अंदाजानुसारच मतदानाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे.
यंदाचा अंदाज
- जून : 108.2 मि. मी.
- जुलै : 94.2 मि. मी.
- ऑगस्ट : 95.4 मि. मी.
- सप्टेंबर : 147 मि. मी.
दोन वर्षात पडलेला सरासरी पाऊस
2020 – 767.2 मि.मी.
2021- 566.7 मि.मी.

