अहमदनगर
नगर जिल्ह्यात तीन वर्षांत 1861 बालमृत्यू..!
नगर : पुढारी वृत्तसेवा : गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात, कोट्यवधीचा खर्चही केला जातो; मात्र तरीही नगर जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचा आकडा चिंताजनकच आहे. गेल्या तीन वर्षांत्त तब्बल 1861 बालकांचा मृत्यू झाल्याचे आकडे सांगत आहेत. एवढेच नाही, तर 73 मातांनाही वाचविण्यात आरोग्य विभागाला अपयश आल्याचे ही आकडेवारी सांगत आहे. संपूर्ण राज्यभरातच गर्भवती माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. नगर जिल्ह्यातही ही यंत्रणा कार्यरत आहे. मातांचे मृत्यू रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले, तरी अजूनही ही आकडेवारी आरोग्य विभागाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
'या' योजनांवर कोट्यवधींचा खर्च!
शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून महिलांना बाळंतपणापूर्वी व बाळंतपणानंतर 5 हजारांची दोन टप्प्यात मदत दिली जाते. जननी सुरक्षा योजनेतून हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झाल्यास 700 ते 500 रुपये दिले जातात. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातून गरोदरपणातील आवश्यक तपासण्या मोफत केल्या जातात. 102 या टोल फ्री क्रमांकावरून गरोदर मातेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध केली जाते. तर आदिवासी भागात मातृत्व अनुदान योजनेमधून गरोदर महिलांना आरोग्य सेवासुविधा पुरविल्या जातात.
माता मृत्यूची कारणे
गरोदरपणातील आरोग्य तपासणी न करणे, वैद्यकीय सल्ला न घेणे, घरीच बाळंतपण करणे, याशिवाय अतिरक्तस्राव होणे, रक्तातील आवश्यक घटकांची उणीव, अचानक वाढलेला रक्तदाब, प्रसूतीनंतरचा जंतुसंसर्ग इत्यादी कारणांमुळे 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन आर्थिक वर्षांत 73 गरोदर मातांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.
बालमृत्यूची कारणे
जन्मजात व्यंग असणे, न्यूमोनियासह अन्य आजारांची बाधा होणे, कमी दिवसांचे बाळ जन्माला येणे इत्यादी कारणांमुळे 0 ते 5 वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो. यात प्रामुख्याने 0 ते 1 वयोगटातील बालकांच्या मृत्यूचा आकडा अधिक आहे. अशाप्रकारे वरील तीन वर्षांत 1861 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
जिल्ह्यात माता-बालमृत्यूचा दर कमी आहे. मात्र तो आणखी कमी करण्यासाठी सीईओंच्या मार्गदर्शनात लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच गरोदरपणात महिलांनी वेळोवेळी तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी. संतुलित आहार घ्यावा. काही त्रास जाणवल्यास तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे.– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
हेही वाचा :

