

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाऊस लांबल्यामुळे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने 18 कोटी 10 लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 17 कोटींची तरतूद केली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा सुरु होतात. उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत जाते. त्यामुळे या टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा केला जातो.
टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच नवीन विंधन विहीर, नळयोजनांची विशेष दुरुस्ती आदी टंचाई निवारणार्थ दर वर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या मोजकीच असणार म्हणून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्तपणे जुलै 2022 ते जून 2023 या वर्षासाठी 7 कोटी 34 लाखांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे.
मात्र, यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले. जून महिना संपायला काही दिवसांचा अवधी बाकी आहे. तरीही पाऊस नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी 18 कोटी 10 लाखांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास या आराखड्यातून टँकरचा खर्च भागवला जाणार आहे.
दिवसेंदिवस पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. आजमितीस 43 गावे आणि 190 वाड्यांतील 77 हजार 612 लोकसंख्येचा घसा कोरडा पडला आहे. या जनतेची तहान भागविण्यासाठी 38 टँकर धावत आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 9, अकोले तालुक्यातील 3, नगर तालुक्यातील 7, पारनेर तालुक्यातील 13 व पाथर्डी तालुक्यातील 6 टँकरचा समावेश आहे.
हेही वाचा