

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी देशातील मतदारयाद्या सातत्याने अद्ययावत केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 21 जुलैपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात नवमतदार नोंदणी व चुकांची दुरुस्ती आदी कामे केली जातील. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 21 जुलै ते 21 ऑगस्ट या काळात घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात नवीन मतदारनोंदणी तसेच मतदारयादी बिनचूक करणे आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 3 हजार 722 मतदानकेंद्र असून, प्रत्येक केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन 18 वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु मतदारयादीत नाव नसलेल्यांंची यादी, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणार्या युवकांची नावे, तसेच मतदारयादीतील दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची माहिती संकलित करून नमुना 7 भरणे, मतदारयादीतील वय, नाव, गाव आदी चुका दुरुस्त करणे आदी माहिती संकलित करणार आहेत. त्यासाठी घरोघरी येणार्या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
ते म्हणाले, की या कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रित प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी तिचे अवलोकन करून, आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करावी. नाव नसल्यास मतदार नोंदणीचा फॉर्म नमुना-6 भरून बीएलओ वा तहसील कार्यालयात सादर करावा. मतदार यादीतील नाव, वय, लिंग व छायाचित्र आदींबाबत काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध आहे. कुटुंबातील एकादी व्यक्ती मयत झाल्यास तिचे नाव यादीतून वगळण्यासाठी फॉर्म नमुना 7 भरावा. दुबार नाव असल्यास जेथे सर्वसाधारणपणे वास्तव्य आहे, तेथे नाव कायम ठेवून उर्वरित ठिकाणावरील नाव वगळावे.
या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 26 डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 1 जानेवारी 2024 आयोगाकडून मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी उपस्थित होते.
जिल्ह्यात 80 पेक्षा अधिक वयाचे 1 लाख 40 हजार मतदार होते. त्यातील 1155 मतदारांनी स्थलांतर केले. 18 हजार 460 मयत झाले. 4 हजार 678 जणांचे चुकीचे वय दाखविले. त्यामुळे 24 हजार 293 मतदार वगळले. याशिवाय खराब छायाचित्र असलेले 98 हजार 412 मतदार होती. त्यापैकी 1 हजार 8 स्थलांतरित झाले. 7 हजार 834 मयत झाले. त्यामुळे 8 हजार 842 मतदार वगळले. एकंदरीत मतदारयादीतून 33 हजार 135 मतदार वगळण्यात आले आहेत.
एकूण मतदारसंख्या
35,67,817 (5 जानेवारी 2023)
पुरुष : 18,56,564
महिला : 17,11,085
इतर : 168
पुरुष व महिला गुणोत्तर ः 922.
आधार लिंक : 57.39 टक्के