पुणे : रास्तापेठेत सर्व इच्छुकांना विजयाची खात्री | पुढारी

पुणे : रास्तापेठेत सर्व इच्छुकांना विजयाची खात्री

संतोष चोपडे

भवानी पेठ : पुणे मनपाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी या प्रभागातून (जुना प्रभाग क्रमांक 16 कसबा पेठ-सोमवार पेठ) निवडून दिले आहे. कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी प्रभागात नाही, त्यामुळे सध्यातरी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना निवडून येण्याची खात्री वाटू लागली आहे.

या प्रभागातील निम्म्यापेक्षा अधिकचा भाग नवीन प्रभागाला जोडला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनल ला संमिश्र वातावरण आहे. मनसेची ही ताकद या भागात आहे. अपक्ष उमेदवार अजय तायडे निवडणूक लढवू शकतात. मध्यम व झोपडपट्टीचा भाग प्रभागात येतो त्यामुळे अरुंद रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या आहेत.

सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने ही लढत त्या वेळी लक्षवेधी ठरली होती. यंदा मात्र सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभागात मोठा विकास निधी आणला, तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी कमी मिळाला आहे. नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचा भाग कसबा मतदार संघाला जोडल्याने ते कोणत्या प्रभागातून लढणार हे पाहावे लागेल, पण विद्यमान नगरसेवक योगेश समेळ यांनी मात्र लगतच्या प्रभागातून लढणार असल्याचे सांगितले. विद्यमान काँग्रेस नगरसेविका सुजाता शेट्टी यांचे पती सदानंद शेट्टी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सुजाता शेट्टी यांची राजकीय वाटचाल अस्पष्ट वाटत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांचा भाग नवीन प्रभागात येत असल्याने त्या प्रबळ दावेदार आहेत. आरक्षणानंतर बंडखोरी कोण करणार, त्यावर पुढील राजकीय समीकरण बदलणार आहेत.

या प्रभागात हे आहेत इच्छुक

इच्छुकांमध्ये भाजपकडून सभागृहनेते गणेश बिडकर, बाळासाहेब घोडके, गणेश यादव, सतीश गायकवाड, उद्धव मराठे, सुवर्णा भरेकर, उज्ज्वला गौड, कल्पना बहिरट. मनसे – माधुरी शिकोत्रे, पूजा पवार, भूषण शिंदे, विशाल पवार. शिवसेना -पल्लवी जावळे, सोनम झेंडे, रवींद्र चव्हाण, सुदर्शना त्रिगुनाईत, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, सागर गायकवाड, कावेरी धनवडे. राष्ट्रवादी- सदानंद शेट्टी, लक्ष्मण आरडे, प्रकाश फुलावरे सचिन शिंदे, चंद्रशेखर धावडे, मनीषा सरोदे, शशिकांत भिसे, मोहनसिंग राजपाल, भोलासिंग अरोरा, प्रिया तांबे, विनोद कालोखे, सागर पवार. आरपी आय – नीलेश आल्हाट, रीना आल्हाट. वंचित – प्रफुल्ल गुजर, रफीक पीरजादे, अर्चना चौरे. काँग्रेस- सुजाता शेट्टी, नितीन परतानी, दत्ता पोळ, वैशाली रेड्डी, रवी मोहिते, रवी आरडे. यांचा समावेश आहे.

अशी आहे प्रभागरचना

संत कबीर चौक, दूध भट्टी, अल्पना टॉकीज समोरील बाजू, दारूवाला पूल, कमला नेहरू हॉस्पिटल, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, चांदतारा मस्जिद, खडीचे मैदान, ताराचंद हॉस्पिटल, शिवाजी स्टेडियम, समर्थ पोलिस स्टेशन, सदानंद नगर, भीमनगर, बाबुराव कन्याशाळा, छत्रपती शाहू उद्यान, रास्ता पेठ ,नाना पेठ, ससून वसाहत, जुनी जिल्हा परिषद.

  • प्रभागाची एकूण लोकसंख्या – 58,994
  • अनुसूचित जाती – 8785
  • अनुसूचित जमाती – 552

Back to top button