कापूस उत्पादनात राज्यातील 19 जिल्हे अग्रेसर

Cotton
Cotton

पुणे : शिवाजी शिंदे : राज्यातील एकोणीस जिल्ह्यांत कापसाच्या पिकाने आघाडी घेतली आहे. त्यातही जळगाव हा सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारा जिल्हा ठरला असून, कापूस उत्पादनात यवतमाळ आणि वाशीम हे जिल्हे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत असली, तरी केवळ 14 जिल्ह्यांत या पिकाचे उत्पादन अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

महसूल विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा ई-पीक पाहणीचा संख्यात्मक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणकोणती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात, याची पाहणी करून त्यानुसार पीकवारीचे क्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात सर्वाधिक (24 लाख 23 हजार हेक्टर) क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. मात्र, ही लागवड राज्यातील केवळ 14 जिल्ह्यांतच मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. इतर जिल्ह्यांत दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य पिकांपैकी एक असलेल्या ऊसपिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतली, असे मात्र दिसून येत नाही.

केळीची जागा घेतली कापसाने

सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला असलेली ओळख मागे पडली आहे. कारण केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड झाल्याचे ई-पीक पाहणी अहवालात आढळून आले आहे. या अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यातील एकूण 4 लाख 89 हजार 691 हेक्टरपैकी 3 लाख 27 हजार 83 हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. जळगावपाठोपाठ कापसाच्या उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर यवतमाळ (2 लाख 29 हजार 388 हेक्टर), वाशीम (2 लाख 33 हजार 984 हेक्टर) क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातही कापसाचे पीक वाढले असून, एकूण 30 हजार 563 हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली असल्याचे दिसून आले.

कापूस लागवड जिल्हानिहाय क्षेत्र

जिल्हा – क्षेत्र (हेक्टरमध्ये) : नंदुरबार 61,034, धुळे 1,28,35, अहमदनगर 31,631, जळगाव 3,27,083, औरंगाबाद 56,458, जालना 74,717, हिंगोली 11,407, बीड 7,163, परभणी 24,178, नांदेड 46,405, नागपूर 30, 565, वर्धा 1,77,141, चंद्रपूर 1,38,687, गडचिरोली 6,402, अमरावती 91,750, अकोला 1,02,827, बुलडाणा 2,09,317, यवतमाळ 2,29,388, वाशीम 2,033,984.)
राज्यात केवळ 14 जिल्ह्यांत सोयाबीनचे अधिक उत्पादन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news