Nashik Grapes News | इस्त्रायल-हमास युद्धातही दीड लाख टन द्राक्षांची निर्यात

द्राक्ष निर्यात,www.pudhari.news
द्राक्ष निर्यात,www.pudhari.news

[author title="नाशिक : सतीश डोंगरे" image="http://"][/author]
ऐन द्राक्ष निर्यातीच्या हंगामात इस्त्रायल- हमास युद्ध भडकल्याने द्राक्ष निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी, निर्यातदारांना महाराष्ट्रातून युरोपला दीड लाख टनापेक्षा द्राक्ष निर्यात करण्यात यश आले आहे. नियमित सुएझ कालव्यातून द्राक्ष कंटेनरची निर्यात न करता, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपमार्गे ही निर्यात करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत निर्यातीत दोन टक्क्यांची वाढ झाल्याने, उत्पादकांसह निर्यातदारांनाही दिलासा मिळाला आहे.

  • दुहेरी संकट: अवकाळी पाऊस आणि इस्त्रायल-हमासमधील युद्धाचा निर्यातीवर परिणाम.
  • निर्यातदारांना महाराष्ट्रातून युरोपला दीड लाख टनापेक्षा द्राक्ष निर्यात करण्यात यश आले.
  • नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या काळात सुमारे १.५७ लाख टन द्राक्षांची निर्यात केली गेली.

महाराष्ट्रातून नाशिक आणि सांगली या जिल्ह्यातील द्राक्ष मुंबई पोर्टवरून युरोपसह अन्य देशांत पाठविले जातात. यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर झालेला परिणाम आणि इस्त्रायल-हमासमधील युद्धाचा निर्यातीवर परिणाम असे दुहेरी संकट निर्माण झाल्याने, द्राक्षाचे अर्थकारण बिघडेल असा तर्क लावला जात होता. मात्र, उत्पादकांसह निर्यातदारांनी चिकाटीच्या जोरावर २०२३-२४ या हंगामात आठ हजारांपेक्षा अधिक द्राक्षाचे कंटेनर युरोपमध्ये पाठविले. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या काळात सुमारे १.५७ लाख टन द्राक्षांची निर्यात केली गेली. मागील वर्षीच्या तुलनेत यात दोन टक्के वाढ झाली असून, मागील हंगामात सुमारे १.५३ लाख टन द्राक्ष निर्यात करण्यात आली होती. यातील १.१८ लाख टन द्राक्ष युरोपीयन देशांमध्ये निर्यात केली, तर उर्वरित ३९ हजार टन द्राक्ष रशिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, दुबई, सौदी येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदा द्राक्ष बाजारपेठेत दिसून आले नाहीत. दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यात द्राक्षाचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा मात्र, नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा हंगाम झाल्याचे दिसून आले.

वाहतूक कालावधीवर परिणाम

इस्त्रायल -हमास युद्धादरम्यान सुएझ कालव्यामार्गे जाणाऱ्या एका जहाजावर हल्ला करण्यात आल्याने, त्या मार्गात बदल करून शिपिंग कंपन्यांनी दक्षिण आफ्रिकेमधील केप ऑफ गुड होपमार्गे वाहतूक सुरू केली. सुएझ कालाव्यामार्गे १८ ते २२ दिवसांचा कालावधी लागायचा, मात्र मार्ग बदलल्याने हा कालवाधी ४५ ते ६० दिवसांवर गेला. त्यामुळे द्राक्षांची गुणवत्ता, टिकवण क्षमता व प्रतवारीवर परिणाम झाल्याने त्याचा फटका निर्यातदारांना सोसावा लागला. याशिवाय शिपिंग कंपन्यांनी जहाजांची उपलब्धता मर्यादित असल्याचे सांगत कंटनेरमागे २७०० ते ३२०० डॉलर इतकी भाडेवाढ केली.

२८ हजार शेतकऱ्यांकडून द्राक्ष लागवड

कृषी विभागाकडे २०२३-२४ हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात २८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सुमारे १८ हजार सहाशे हेक्टरवर द्राक्षबागा केल्याची नोंदणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र अंदाजे ५८ हजार ३६७ हेक्टर इतके असून, निफाड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २२ हजार हेक्टर आहे. त्यापाठोपाठ दिंडोरीमध्ये १५ हजार ७५८, नाशिकमध्ये ११ हजार ६७१ व चांदडवमध्ये पाच हजार १४८ हेक्टर द्राक्ष लागवड क्षेत्र आहे. बागलाण आणि कळवण तालुक्यांतही द्राक्षाची लागवड केली जाते.

हमास-इस्त्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला. एरवी युरोपला निर्यात करताना १८ ते २२ दिवसांचा कालावधी लागायचा. मात्र, मार्ग बदलल्याने हा कालावधी ४० ते ६० दिवसांवर गेला. सुरुवातीला शिपिंग कंपन्यांकडून ३५ ते ४० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले गेले. पण तो कालावधी ६० दिवसांवर पोहोचल्याने, द्राक्षांच्या क्वॉलिटीचा प्रश्न निर्माण झाला. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात समाधानकारक झाली त्याचा दिलासा मिळाला. – सागर देवरे, निर्यातदार.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news