दिवसा रेकी अन् पहाटे चोर्‍या; तामिळनाडूच्या दोघा भावांना बेड्या; 31.39 लाखांचा ऐवज जप्त

दिवसा रेकी अन् पहाटे चोर्‍या; तामिळनाडूच्या दोघा भावांना बेड्या; 31.39 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवसा रेकी करून पहाटेच्यावेळी चोर्‍या करणार्‍या तामिळनाडूच्या दोघा भावांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पहाटेच्या वेळी पीजी (पेइंग गेस्ट) मधून हे चोरटे महागडे लॅपटॉप, मोबाईल आणि डिजीटल घड्याळांची चोरी करत होते. संगणक क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांच्या ऐवजावर प्रामुख्याने हे चोरटे डल्ला मारत होते.

बाबू राममूर्ती बोयर (वय 29), सुरेश राममूर्ती बोयर (वय 24, रा. कदमाक वस्ती, लोणी काळभोर' मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक केलेल्या दोघा आरोपी भावांची नावे आहेत. विश्रांतवाडी, विमानतळ, लोणीकंद, भोसरी पोलिस ठाण्यातील 9 गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी 19 लॅपटॉप, 63 मोबाईल, पाच डिजीटल घड्याळे असा 31 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

काम करण्याची पद्धत:

मागील काही दिवसांपासून शहरातील पीजीमधून तरुणांचे लॅपटॉप, मोबाईल, महागडी घड्याळे पहाटेच्यावेळी चोरीला जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली होती. आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. काही कारणामुळे दरवाजा उघडा राहिल्याची संधी मिळताच, हे दोघे चोरटे क्षणाचाही विलंब न करता सफाईदारपणे चोरी करून पोबारा करत होते. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातदेखील याबाबतचा एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस करत होते.

दरम्यान, हद्दीत गस्तीवर असताना, पोलिस कर्मचारी संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना याबाबत माहिती मिळाली होती. धानोरी रोड परिसरात दोन संशयित व्यक्ती थांबल्याचे समजल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलिस हवालदार दीपक चव्हाण, बबन वणवे, यशवंत किर्वे, वामन सावंत, कर्मचारी संदीप भोसले,संदीप देवकाते, शेखर खराडे यांच्या पथकाने बाबू आणि सुरेश यांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी करून झडती घेतली असता, चार लॅपटॉप आणि सात मोबाईल मिळून आले. त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात चोरीचे लॅपटॉप, मोबाईल मिळून आले. दोघे आरोपी भाऊ कामाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. सुरुवातीला मिळेल ती मोलमजुरीची कामे करत होते. मात्र, काही दिवसांतच त्यांनी चोर्‍या करण्यास सुरुवात केली. दिवसा रेकी करून पहाटेच्यावेळी पीजीमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करून ते मूळ गावी तामिळनाडू येथे कमी किंमतीत विक्री करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलिसांनी केली.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news