बालेकिल्ल्यातच नक्षल्यांना हादरा: 7 गावांतील नागरिकांनी केली नक्षल्यांना गावबंदी

बालेकिल्ल्यातच नक्षल्यांना हादरा: 7 गावांतील नागरिकांनी केली नक्षल्यांना गावबंदी

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मागील 40 वर्षांपासून नक्षलांच्या त्रासाने भामरागड तालुका धगधगत होता. या पार्श्वभुमीवर धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत सात गावांतील नागरिकांनी एकत्र येवून नक्षल्यांवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्धार केला आहे. भामरागड परिसरात घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग असल्याने हा परिसर नेहमीच नक्षल्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. या तालुक्यात नक्षल्यांनी अनेकदा मोठमोठ्या हिंसक घटना घडविल्या आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नक्षल गावबंदी योजनेचा फायदा घेत नक्षल्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

नक्षलवादी गावबंदी योजना

राज्य शासनाने 2003 मध्ये नक्षल गावबंदी योजना सुरु केली. या योजनेच्या आधारावर पोलिस प्रशासनाने दादालोरा खिडकी उपक्रम सुरु करुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यास प्रारंभ केला. यामुळे नागरिकांचा पोलिसांप्रती असलेला विश्वास वाढला. शुक्रवारी (दि.14) धोडराज येथे पोलिस विभागाने कृषी मेळावा घेतला. यामध्ये परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. तो ठराव धोडराज पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. यापुढे नक्षल्यांना रेशन, भोजन – पाणी देणार नाही तसेच नक्षल्यांच्या संघटनेत सहभागी होणार नाही. यासोबतच बैठक किंवा कार्यशाळेत जाणार नाही असे गावकऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी मिळदापल्ली येथील नागरिकांनी नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली शस्त्रे काढून ती पोलिसांकडे सुपूर्द केली. नक्षल गावबंदी करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, धोडराजचे प्रभारी पोलिस अधिकारी शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. यासोबतच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षल्यांना गावबंदी करणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांनी नक्षल्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, पोलिस सदैव गावकऱ्यांच्या पाठीशी राहतील, अशी ग्वाही नीलोत्पल यांनी दिली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news