Legislative Assembly | मनसेचा स्वबळाचा नारा; इच्छुक लागले कामाला

Legislative Assembly | मनसेचा स्वबळाचा नारा; इच्छुक लागले कामाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीचा घटक पक्ष झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाची भाषा सुरू केल्याने, पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकचा गड पुन्हा एकदा खेचून आणण्याच्या इराद्याने अनेकांकडून विधानसभा लढविण्याची इच्छा बोलून दाखविली जात आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत आमदार निवडून आणणाऱ्या मनसेला नंतरच्या काळात मात्र, ही किमया कधी साधता आली नाही. उलट जे आमदार निवडून आले, त्यांनादेखील पक्षात टिकवणे मनसेला जमले नाही. सद्यस्थितीचा विचार केल्यास, शहरातील मनसेचे संघटन कमकुवत असून, पदाधिकाऱ्यांची फळीदेखील जेमतेम आहे. याशिवाय पक्षांतर्गत गटा-तटाचे राजकारण जोरात आहे. वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ तसेच निष्ठावान विरुद्ध आयात असा वाद मिटता मिटत नसल्याने, पक्षवाढ पूर्णपणे खुंटली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच कारणावरून बऱ्याचदा पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. मात्र, अशातही अंतर्गत कलह कायम असल्याचे चित्र आहे. या सर्व कमकुवत बाबी घेऊन पक्ष आगामी विधानसभेला सामाेरे जाणाऱ्या मनसेला नाशिककर गतवैभव प्राप्त करून देणार काय? हा प्रश्न आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांत विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे पक्षाने या तिन्ही मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी मनसेचे स्थानिक नेते इच्छुक आहेत. पश्चिममध्ये शहराध्यक्ष सुदाम कोंबडे तयारीत असून, पूर्वमध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय मध्यमध्येदेखील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार तयारीत असल्याची चर्चा आहे. याशिवाय देवळाली मतदारसंघातही मनसे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे.

बंडखोरांवर डोळा

महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शहरातील तिन्ही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. याशिवाय 'मविआ'तील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गटातही इच्छुक तयारीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जागावाटपासह तिकिटाचा तिढा सोडविण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुखांसमोर आहे. प्रबळ उमेदवारास तिकीट देताना इतर इच्छुकांची बंडखोरी रोखता येईल काय? असा प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे. इच्छुकांनी बंडखोरी केल्यास त्यांच्यासमोर मनसे हा सक्षम पर्याय ठरण्याची शक्यता असल्याने, बंडखोरांवरदेखील मनसेचे लक्ष असेल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news