Nashik : नावालाच ‘स्मार्ट’, दुरुस्तीविना शाळांची लागली वाट

Nashik : नावालाच ‘स्मार्ट’, दुरुस्तीविना शाळांची लागली वाट

[author title="नाशिक : आसिफ सय्यद" image="http://"][/author]
स्मार्ट स्कूल प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शाळा इमारतींच्या दुरुस्तीकडे मात्र कानाडोळा केल्याने गळक्या शाळांमध्ये बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येऊन ठेपली आहे. नूतन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आता जेमतेम चार दिवसांचाच कालावधी शिल्लक असताना शाळा इमारत दुरुस्तीच्या प्रस्तावालादेखील बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळू न शकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शाळांची दुरुस्ती होणार कधी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या माध्यमातून ८८ प्राथमिक, तर १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. शहरातील सहाही विभागांतील महापालिकेच्या मालकीच्या ७० इमारतींमध्ये या शाळा भरतात. मनपाच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, खासगी शाळांच्या स्पर्धेत या शाळांमधील विद्यार्थ्यांचा निभाव लागला यासाठी तब्बल ७५ कोटी रुपये खर्चातून स्मार्ट स्कूल प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. याअंतर्गत ८२ शाळांमध्ये ६५६ डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले आहेत. शाळांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून होत असताना महापालिकेच्या अन्य विभागांची बुरसटलेली मानसिकता या शाळांच्या दर्जोन्नतीसाठी मारक ठरत आहे. शाळा इमारतींची उभारणी अनेक वर्षांपूर्वी झालेली आहे. ते बांधकाम जुने झाल्याने वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती केली जाणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता शाळा सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना शाळा इमारतींची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

३५ नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता

गेल्या दोन-तीन वर्षांत विद्यार्थिसंख्या वाढत असल्याने वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याची बाबही शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. नऊ शाळांसाठी ३५ नवीन वर्गखोल्यांची मागणी या पत्राद्वारे नोंदविण्यात आली आहे.

देखभाल दुरुस्तीत ही कामे

शाळा इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्यामध्ये खिडक्यांचे तावदाने बदलणे, दारांना कडीकोयंडा बसविणे, खिडक्यांना जाळी बसविणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, छत गळती रोखणे, नवीन वर्गखोल्या बांधणे, पत्र्यांचे शेड टाकणे, शोषखड्डा करणे, ग्रील व चॅनल गेट बसविणे अशा विविध स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे.

या १५ शाळांचा प्रस्ताव

मनपा शाळा क्रमांक ६५ बजरंगवाडी, मनपा शाळा क्रमांक ३३ महादेवनगर सातपूर, मनपा शाळा क्रमांक २ बोरगड म्हसरूळ, मनपा शाळा क्रमांक ४६ उपनगर नाशिक रोड, मनपा शाळा क्रमांक ७४ अंबड लिंक रोड, मनपा शाळा क्रमांक २५ राधाकृष्ण नगर सातपूर, मनपा शाळा क्रमांक १७ कामगार नगर सातपूर, मनपा शाळा क्रमांक २२ शिवाजीनगर सातपूर, मनपा शाळा क्रमांक २४ विश्वासनगर, मनपा शाळा क्रमांक ७५ चुंचाळे अंबड, मनपा शाळा क्रमांक ९० वाडीचे रान, पाथर्डी गाव, मनपा शाळा क्रमांक ६ आडगाव, मनपा शाळा क्रमांक ७९, चुंचाळे, मनपा शाळा क्रमांक ६६, उर्दू शाळा, वडाळा, मनपा शाळा क्रमांक ८९, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा या १५ शाळांचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.

शाळा दुरुस्तीसंदर्भातील शिक्षण विभागाचा प्रस्ताव नुकताच प्राप्त झाला आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन शाळा दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली जाईल. – संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

स्मार्ट स्कूलची यंत्रणाही कोलमडली

८२ शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. यापैकी ३५ शाळांना पुरेसा वीजपुरवठा नसल्याने स्मार्ट स्कूलसाठीची यंत्रणा काही प्रमाणात कोलमडली आहे. या शाळांचा वीजपुरवठा सिंगल फेजवर असल्याने त्यावर स्मार्ट स्कूलची संपूर्ण यंत्रणा चालविताना अडचणी येत आहेत. या शाळांसाठी थ्री-फेजचा वीजपुरवठा मिळावा, असा प्रस्ताव शिक्षण विभागाने मनपाच्या विद्युत विभागाकडे सादर केला आहे. मात्र, या विभागाकडून आपल्या नेहमीच्या कारभाराप्रमाणे सरकारी काम अन् सहा महिने थांब अशी भूमिका घेतली आहे.

शाळा दुरुस्तीसंदर्भात बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. १५ शाळांची दुरुस्ती तसेच नवीन वर्गखोल्या बांधण्याची मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. – बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news