Nashik Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या सात विद्यार्थ्यांची आयआयटी झेप

नाशिक : सुपर- ५० उपक्रमाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल. समवेत नाशिक तालुका गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे आदी.
नाशिक : सुपर- ५० उपक्रमाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल. समवेत नाशिक तालुका गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सलग दोन वर्षे निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये यापैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ५ मुली व २ मुलांचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने २०२२ मध्ये सुपर- ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

सुपर- ५० उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली. या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी सुभाष बोरसे (एआयआर ९६८), डिंपल अशोक बागूल (एआयआर १०१०), हर्षदा संजय वाटणे (एआयआर २२६३), आकांक्षा विनोद शेजवळ (एआयआर २९९३), मंगेश कृष्णा इंपाळ (एआयआर ३०४२), सागर मनोहर जाधव (एआयआर ३०४७), वृषाली जनार्दन वाघमारे (एआयआर ६१८९) या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश संपादन केले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांचे आयआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी

विद्यार्थी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असून, काही विद्यार्थ्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात, तर काही विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती हलाखीची त्यात उच्च शिक्षणाविषयी सुयोग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यावर मात करत सुपर ५० उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या यशाला गवसणी घातली आहे.

आई-वडील शेती करतात. लहानपनापासून शिक्षणाची आवड आहे. कुटुंबीयांना आधी परीक्षांबद्दल माहिती नव्हती. नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर सुपर- ५० निवड परीक्षा उत्तीर्ण झाले. जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आता आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. – अश्विनी बोरसे, विद्यार्थिनी

आई- वडील हे मजुरी करतात. कौटुंबिक परिस्थिती बिकट असताना सुपर- ५० उपक्रमामुळे आयआयटीयन बनण्याचे स्वप्न पहिले आणि ते पूर्ण होत आहे. आई-वडिलांना ते करत असलेल्या कष्टातून मुक्त करायचे आहे. – सागर जाधव, पळसण, सुरगाणा

जिल्हा परिषदेचा सुपर- ५० हा उपक्रम दोन वर्षांपुूर्वी सुरू करण्यात आला होता. यामध्ये वेळोवेळी पालकमंत्री दादा भुसे आणि सीईओ आशिमा मित्तल यांचे मार्गदर्शन लाभत होते. संचालक म्हणून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करता आले. – भारत टाकेकर, संचालक, सुपर- ५० उपक्रम, उपाध्ये क्लासेस

पालकमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे काैतुक

पालकमंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news