New Delhi : अजित पवार गटाला राज्यसभेसह दोन विधान परिषदेच्या जागा मिळणार

New Delhi : अजित पवार गटाला राज्यसभेसह दोन विधान परिषदेच्या जागा मिळणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसह दोन विधान परिषदेच्या जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते पियुष गोयल हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा जिंकली आहे. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार आहे, ही रिक्त जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. तसेच प्रफुल पटेल यांचीही यापूर्वीची राज्यसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे पियुष गोयल यांच्या जागेसह दोन लोकांना अजित पवार गटाकडून राज्यसभेवर जाता येणार आहे. यासह विधान परिषदेच्याही 2 जागा अजित पवार गटाला मिळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट साताऱ्याची जागा लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना ही लोकसभेची जागा मिळू शकली नाही. त्यानंतर सातारा लोकसभेच्या बदल्यात पियुष गोयल यांची रिक्त होणारी जागा अजित पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. तसा समझोता महायुतीत आधीच झाला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पियुष गोयल यांच्या जागेवर साताऱ्याचे नितीन पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी द्यायची, याबाबत अद्याप काहीही ठरले नाही. या जागेसाठी माजी खासदार समीर भुजबळ, आनंद परांजपे, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार इच्छुक असल्याचे समजते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news